जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं.

मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव देखील नाकारून चालणार नाही. दिवसेंदिवस राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या फाळणीनंतर अनेक राज्यकर्त्यांनी देशाच्या सत्तेची कमान आपल्या हातात घेतली मात्र तरीही शेतकरी आत्महत्यावर तोडगा निघू शकला नाही. महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले मात्र कोणत्या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी होऊ शकला नाही.

याउलट यामध्ये दिवसेंदिवस वाढतच होत आहे. विशेष बाब म्हणजे सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकार हे आम्ही शेतकरी आत्महत्या समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू असा दावा करत आहे. म्हणजेच प्रत्येक सरकार महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असल्याचे मान्य करते. परंतु यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात आणि केलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? याचे उत्तर जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हाती काहीच लागत नाही. निश्चितच सत्तेत आलेले सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करते.

यासाठी हजारो करोडो रुपयांची घोषणा देखील होते, हजारो करोडो रुपये खर्च देखील होतात. मात्र शेतकरी आत्महत्या समूळ नष्ट होणं तर सोडा पण त्याचे प्रमाण देखील कमी होत नाहीये. यामुळे नेमक आपण स्वातंत्र्य कृषीप्रधान देशात वावरतोय की इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातून शेतकरी आत्महत्येची एक नवीन काळीज पिळवटणारी आकडेवारी समोर येत आहे. हाती आलेल्या नवीन आकडेवारीनुसार जुलै 2022 ते जानेवारी 2023 या सात महिन्याच्या काळात रोजाना सरासरी आठ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा फास दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे चित्र आहे. मात्र नवोदित सरकार आणि विपक्ष मध्ये बसलेले लोक आरोप प्रत्यारोप करत खोक्याच्या राजकारणात धुंद असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या या जटील आणि चिंतेच्या विषयावर खरंच मंथन होत आहे का? शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत का? हो तर मग गेल्या सात महिन्यातील ही आकडेवारी शासनाच्या दाव्यावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

सरकार जर यासाठी उपाय योजना आखत आहेत तर मग त्या उपाययोजना जमिनीवर सत्यात उतरत नसल्याचे स्पष्ट होत असून शासनाने केवळ उपाय योजना कागदोपत्री आखून त्याचा उपयोग होणार नसून या उपायोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच देखील कार्य शासनाला कराव लागणार आहे. दरम्यान या नवीन आकडेवारीनुसार एक धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात 12 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या चिंतेचाच विषय होता.

अशातच आता सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी बांधवांनी नानाविध अशा संकटांमुळे आपले जीवन संपवले असल्याने कुठे ना कुठे शासनाचे धोरण कुचकामी ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. जुलै २१४, ऑगस्ट २९७, सप्टेंबर २७३, ऑक्टोबर २६८, नोव्हेंबर २३८, डिसेंबर २१५, जानेवारी २१२ अशा एकूण १७१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शासकीय आकडेवारीतून समोर येत आहे. खरं पाहता, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना राज्य शासनाकडून दोन लाखाची मदत दिली जाते. आधीच ही मदत वाढती महागाईच्या तुलनेत त्रोटक आहे.

अशातच, जुलै ते जानेवारी या काळात शेतकरी आत्महत्या झालेल्या 680 प्रकरणांची अद्याप चौकशी झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. म्हणजेच या शेतकरी कुटुंबांना अजून शासनाकडून मदत मिळालेली नाही. निश्चितच शेतकरी आत्महत्येसाठी शासनाच्या उपायोजना कुचकामी ठरत असतानाच शेतकरी आत्महत्या होऊनही शासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया राबवली जात नसल्याने करता पुरुष गेलेल्या या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षी जून 2022 मध्ये राज्यात सत्ता बदल झाला आणि भाजपाच्या पाठिंबाने एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहण्यास सुरुवात केली.

सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून महाराष्ट्रात यापुढे एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र जुलै 2022 ते जानेवारी 2023 या काळात अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, यवतमाळ, बुलढाणा व वर्धा या आठ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. यामुळे शिंदे यांची ग्वाही फोल ठरली आहे. एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे, शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे, शासनाच्या धोरणामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव उघडकीस आल आहे.