Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांना आता अपघात झाला तरी अनुदान मिळणार ! शिंदे सरकारने जाहीर केली नवीन योजना, पहा….

Maharashtra Farmer Scheme : शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांचे अनेकदा शेती करताना अपघात होतात. अपघातामध्ये काही शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होतात. या अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घरातील कर्ता पुरुष गमावल्याने या अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी पूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जात होती. या योजनेची सुरुवात 2019 पासून झाली. मात्र ही अपघात विमा योजना कंपन्यांच्या माध्यमातून राबवली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अपघातांचे दावे वेळेवर निकाली न काढणे, विनाकारण अपघातांचे दावे रद्द करणे यांसारखे अनेक आरोप कंपन्यांवर केले जात होते.

यामुळे ही अपघात विमा योजना बदलण्याची मागणी अनेक शेतकरी संघटनांच्या माध्यमातून, विरोधी पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून एवढेच नाही तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही या अपघात विमा योजनेत बदल करण्याची मागणी शासनाकडे जोर धरत होती. शासनाने या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांना समज देखील दिली.

मात्र विमा कंपन्यांच्या कामात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारने ही योजना बंद करून नवीन समुद्र अनुदान योजना सुरू केली आहे. म्हणजे आता अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी बंद करण्यात आली असून थेट सानुग्रह अनुदान देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ असे या नवीन योजनेचे नाव ठेवण्यात आले आहे.

म्हणजे आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेसाठी 10 ते 75 वर्षे वयोगटातील शेतकरी पात्र राहणार आहेत. आता या योजनेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकार्‍यांकडून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरणे निकाली काढून शासनाकडून अनुदान वर्ग केले जाणार आहे.

किती अनुदान मिळणार?

शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास अशा मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत दोन लाखाचे अनुदान मिळणार आहे. तसेच अपघातामध्ये दोन हात, दोन पाय किंवा दोन डोळे गमावलेल्या शेतकऱ्याला देखील 2 लाखाचे अनुदान मिळणार आहे. तसेच एक अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत एक लाखाचे अनुदान देण्याचे प्रावधान आहे.

असे अपघात झाल्यास अनुदान मिळणार

 • रस्ता किंवा रेल्वे अपघात झाल्यास
 • पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास
 • कीटकनाशकांमुळे किंवा जंतुनाशकांमुळे विषबाधा झाल्यास
 • विजेचा शॉक
 • विज पडून मृत्यू
 • सर्प दंश किंवा विंचू दंश
 • नक्षलवाद्याकडून हत्या झाल्यास 
 • वन्य जनावरांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास
 • बाळंतपणात मृत्यू झाल्यास
 • दंगलीत जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास

कोण कोणती कागदपत्रे लागणार

 • अपघात ग्रस्त शेतकऱ्याचा सातबारा उतारा
 • मृत्यू दाखला
 • वारस नोंद
 • वयाचा पुरावा
 • प्रथम माहिती अहवाल
 • स्थळ पंचनामा
 • पोलीस पाटीलचा अहवाल