मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा; प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुसाट

Published on -

Mumbai-Pune High Speed Corridor : केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामधील सर्वात लक्षवेधी घोषणा म्हणजे मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर.

हा कॉरिडॉर प्रत्यक्षात आल्यास मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे. सध्या वाहतूक कोंडी, उशीर आणि अपघातांचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना दिलासादायक ठरणार आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशभरात एकूण 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केली. यामध्ये मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या महाराष्ट्राशी संबंधित दोन कॉरिडॉरचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राला पहिल्यांदाच सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मिळणार असून पुणे हे या नेटवर्कचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या कॉरिडॉरमुळे केवळ मुंबई-पुणेच नव्हे, तर पुढे इतर राज्यांशी देखील जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.

घोषित करण्यात आलेल्या 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरु, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरु, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी–सिल्लीगुरी यांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे देशातील प्रमुख औद्योगिक, आयटी आणि व्यापारी शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. परिणामी व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे.

यासोबतच अर्थमंत्र्यांनी पुढील 5 वर्षांत देशात 20 नवीन जलमार्ग विकसित करण्याची घोषणाही केली आहे. या जलमार्गांचा उपयोग प्रामुख्याने मालवाहतूक आणि जहाजबांधणीसाठी केला जाणार आहे.

वाराणसी आणि पाटणा येथे जहाजबांधणी केंद्र उभारण्यात येणार असून, ओडिशामध्ये तब्बल 22 नवीन जलमार्ग सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे जलवाहतूक स्वस्त, पर्यावरणपूरक आणि प्रभावी होणार असून ‘लॉजिस्टिक्स कॉस्ट’ कमी होण्यास मदत होईल.

एकूणच, मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि नवीन जलमार्गांच्या घोषणेमुळे देशाच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा विकास वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News