Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी पाहता सरकारकडून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील नागरिकांना मेट्रोमुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून भविष्यात या मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जाणार आहे.
एवढेच नाही तर या मार्गांच्या विस्तारीकरणासाठी आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून अनेक विस्तारित मार्ग प्रस्तावित आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग दोन्ही दिशेला विस्तारला जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका पासून हा मार्ग थेट निगडी पर्यंत नेला जाणार आहे आणि इकडे स्वारगेट पासून हा मार्ग कात्रज पर्यंत विस्तारित करण्याचा प्लॅन आहे. यातील महत्त्वाची बाब अशी की पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले असून लवकरात लवकर हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गासाठी लवकरच निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे आणि याचेही काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाच आता स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गावरील स्थानकांची संख्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आधी या मार्गावर फक्त तीन मेट्रोस्थानके तयार होतील असे म्हटले जात होते मात्र आता ही स्थानकांची संख्या पाच पर्यंत वाढवण्यात आली आहे. फक्त स्थानकांची संख्याच वाढवण्यात आली नाही तर स्थानकांच्या जागेतही बदल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचा सुधारित प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आला आहे.
स्वारगेट ते कात्रज मार्गावर पाच स्थानके तयार होणार
आधी या मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज ही स्थानके विकसित होणार होती. मात्र आता या मार्गावरील मेट्रो स्थानांची संख्या वाढवण्यात आली आहे तसेच मेट्रोस्थानकांच्या जागेत सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाच्या सुधारित प्रस्तावानुसार आता मार्केट यार्ड – उत्सव हॉटेल चौक, बिबवेवाडी / सहकारनगर – नातूबाग, पद्मावती – श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ, बालाजीनगर – भारती विद्यापीठ, कात्रज – कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेलजवळ ही पाच स्थानके विकसित होणार आहेत.
नक्कीच या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून पुण्यातील वाहतूककोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेट्रोचा हा विस्तारित मार्ग मोठी मोलाची भूमिका निभावणार अशी शक्यता आहे.