Pune News : पुणे नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे ही पुणे अहमदनगर आणि नासिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प या तीन जिल्ह्यांना मोठा फायदेशीर ठरेल आणि मध्य महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासात भर पडेल यात तीळ मात्र देखील शंका नाही.
या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे नासिक आणि अहमदनगरचा कांदा पुण्याच्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करेल परिणामी शेतकऱ्यांचा फायदा होईल. या नवीन रेल्वे मार्गामुळे पुणे आणि नाशिक हे अंतर रेल्वे मार्गाने केवळ अडीच तासात कापता येणे शक्य होईल.
साहजिकच शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि वाईन सिटी म्हणून अख्या जगात ख्याती प्राप्त नासिक यादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यास या मार्गामुळे मदत होणार आहे. निश्चितच हा प्रकल्प नासिक अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मात्र या प्रकल्पाला वारंवार अडचणी येत आहेत. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी महारेल च्या माध्यमातून नासिक जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती पत्र पाठवण्यात आले आणि त्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र तदनंतर महारेलने पुन्हा एकदा पत्र पाठवलं आणि भूसंपादन तसेच जमीन मूल्यांकनाचे काम नाशिक मध्ये पुन्हा एकदा सुरू झाले. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मोजणीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. जमीन मोजणी तात्पुरती स्थगित असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या काही परवानग्यां मिळाल्या नसल्याने या जमीन मोजणीच्या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती खेड प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. चाकण परिसरातील या रेल्वेमार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीच्या मोजण्या जवळपास एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
खरं पाहता, या परिसरातील कडाचीवाडी, रासे व इतर गावांच्या मोजण्या करण्यात येणार आहेत. या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी चाकणची कडाचीवाडी येथे रेल्वे जंक्शन तयार होणार आहे. मात्र संरक्षण विभागाने हरकती घेतल्यानंतर काही गावातील जमिनीचे गट बदलले आहेत. खेड तालुक्यातील 21 गावांमधून रेल्वे मार्ग जात असून यातून केळगाव या गावाला वगळण्यात आले आहे.
निश्चितच गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पाला ब्रेक लागला होता आणि आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या जमिन मोजण्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या असल्याने या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.