महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटींची विक्रमी तरतूद

Published on -

Railway News : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठी तब्बल २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस सरकारच्या काळातील निधीच्या तुलनेत ही तरतूद जवळपास २० पट अधिक असल्याचे सांगत, यामुळे राज्यातील रेल्वे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी एकूण २ लाख ७८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यापैकी मोठा वाटा महाराष्ट्राला मिळाला असून, राज्यातील विविध प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसह सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

या अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर. मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडॉरमुळे सध्या तीन ते चार तासांचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

तसेच पुणे-हैदराबाद प्रवासाचा कालावधी १ तास ५५ मिनिटांपर्यंत कमी होईल. या कॉरिडॉरमुळे मुंबई ते हैदराबाद हे अंतर तीन तासांच्या आत पार करता येणार असून, सर्व मार्ग ताशी ३५० किलोमीटर वेगासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

पूर्व-पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरअंतर्गत महाराष्ट्रातील वाढवण बंदराला थेट रेल्वे जोड मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील मालवाहतूक अधिक वेगवान होईल.

महाराष्ट्रात १०० टक्के रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, २०१४ नंतर ३,७४४ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. तसेच १,२२८ उड्डाणपूल व अंडरपास बांधण्यात आले आहेत.

राज्यात सध्या १२ जोड्या वंदे भारत आणि पाच जोड्या अमृत भारत गाड्या धावत आहेत. ‘कवच’ सुरक्षा प्रणालीअंतर्गत ५७६ किमी मार्गावर काम पूर्ण झाले असून, हजारो किलोमीटरवर काम सुरू आहे.

अमृत भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असून, त्यासाठी ५,६७५ कोटींची गुंतवणूक होत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News