Ration Card News : नवीन रेशन कार्ड बनवायचं? मग आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. खरेतर, आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत संयुक्त कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंबाला अधिक प्राधान्य दाखवले जाते.
विभक्त कुटुंब संख्या अलीकडे झपाट्याने वाढताना दिसत आहे. लग्नानंतर वेगळे राहणे, भावंडांमध्ये मालमत्तेची वाटणी होणे, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त विभक्त कुटुंब पद्धत रूढ झाली आहे.

आता कुटुंब विभक्त झाल की स्वतंत्र रेशनकार्ड काढणे पण तितकंच गरजेचे ठरते. मात्र, नवीन रेशन कार्ड काढण्याच्या या प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत आज आपण नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्वतंत्र रेशन कार्ड कधी मिळणार?
जेव्हा कुटुंब विभक्त होतं तेव्हा स्वातंत्र्य रेशन कार्ड काढावा लागतो. रेशनकार्डच्या दृष्टीने कुटुंब विभक्त झाल्याचा अर्थ असा होतो की, कुटुंबातील एखादा सदस्य किंवा त्याचे स्वतंत्र कुटुंब वेगळ्या घरात राहून स्वतंत्र स्वयंपाक व्यवस्था ठेवत आहे.
अशा व्यक्तीला किंवा कुटुंबाला स्वतंत्र रेशनकार्ड मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, यासाठी काही अटी आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते.
स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तिचे नाव आधीच्या रेशनकार्डवर नोंदलेले असावे किंवा कुटुंबप्रमुखाची संमती व विभक्त राहण्याचा पुरावा सादर करावा लागतो. स्वतंत्र घर, स्वतंत्र स्वयंपाक आणि वेगळा पत्ता असल्याचे स्पष्ट पुरावे असणे महत्त्वाचे मानले जाते.
अर्ज प्रक्रियेसाठी आधारकार्ड (सर्व कुटुंबीयांचे), जुन्या रेशनकार्डची प्रत, कुटुंब विभाजनाचा करारनामा किंवा नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे प्रमाणपत्र, रहिवासी पत्त्याचा पुरावा (वीज बिल, पाणी बिल, भाडेकरार), पासपोर्ट साइज फोटो आणि आवश्यक असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र अशी कागदपत्रे लागतात.
स्वतंत्र रेशनकार्डसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. ‘महा-फूड’ किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तहसील कार्यालय, अन्नपुरवठा कार्यालय किंवा रेशनकार्ड सेवा केंद्रात ऑफलाइन अर्ज सादर करता येतो.
तीस दिवसात मंजूर होतं नविन रेशन कार्ड
अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित विभागाकडून कागदपत्रांची तपासणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पाहणीही होऊ शकते. सर्व माहिती योग्य आढळल्यास साधारण 15 ते 30 दिवसांत स्वतंत्र रेशनकार्ड मंजूर केले जाते. नागरिकांनी अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नये, अन्यथा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.













