Business Success Story:- व्यक्तीकडे काही जरी नसले तरी चालते परंतु व्यक्तीमध्ये ध्येय असणे खूप गरजेचे आहे व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट, जिद्द आणि प्रयत्न मधील सातत्य हे गुण असणे खूप आवश्यक आहे. खिशात एक रुपया जरी नसला तरी हे गुण जर सोबत असतील तर व्यक्ती शून्यातून कोट्यावधी रुपयांचे साम्राज्य उभे करू शकतो.
या मुद्द्याला धरून जर आपण पाहिले तर अशी अनेक व्यवसायिकांची उदाहरणे आपल्याला समाजामध्ये दिसून येथील व यातील कित्येक जणांनी अगदी खडतर व बिलकुल विपरीत परिस्थितीतून कष्ट केले व नियोजनाने त्यांनी आयुष्यात यशाचे अत्युच्च शिखर गाठले. अशा मोठ्या व्यावसायिकांपैकी जर आपण केरळ मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रवी पिल्लई यांचे उदाहरण घेतले तर त्यांचे देखील जीवन हे असेच उल्लेखनीय अशा कर्तुत्वाने भरलेले आहे.
रवी पिल्लई यांनी उभे केले शून्यातून विश्व
रवी यांचा जन्म केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. विशेष म्हणजे त्यांचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला हे संपूर्ण कुटुंब शेतकरी कुटुंब होते. अगदी आर्थिक हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी कोच्ची विद्यापीठातून बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवीत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतले व नोकरी न करता अगदी जीवनाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये व्यवसाय करायचे ठरवले
व यामध्ये मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागले. परंतु येणाऱ्या प्रत्येक समस्येवर त्यांनी मात केली व 1978 मध्ये सौदी अरेबिया या ठिकाणी जाऊन त्यांनी दीडशे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एका बांधकाम कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आज जर त्यांच्या या बांधकाम कंपनीतील कर्मचाऱ्यांचे संख्या पाहिली तर ती तब्बल 70 हजार पेक्षा जास्त आहे.
रवी पिल्लई यांनी आरपी ग्रुपची स्थापना केली
रवी पिल्ले यांनी आरपी ग्रुपची स्थापना केली व आज त्यांचा हा ग्रुप अब्जावधी डॉलरचा बनला असून या ग्रुपच्या माध्यमातून ते हॉटेल्स, स्टील उद्योग तसेच गॅसचे सिमेंट व शिपिंग मॉल उद्योगापर्यंत व्यवसायाचा विस्तार केलेला आहे. रवी यांचा आरपी ग्रुप हा बांधकाम क्षेत्रातील एक प्रसिद्ध असा ग्रुप असून त्याचे उत्पन्न 64 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते.
त्यांच्या या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला व या विस्तारामध्ये त्यांनी प्रामुख्याने स्टील तसेच गॅस उद्योग, सिमेंट व तेल उद्योग आणि शॉपिंग मॉल व त्यासोबत आरामदायी हॉटेल्स चा समावेश केला. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन अगदी गरिबीतून उभे राहून रवी पिल्लई यांच्याकडे आज शंभर कोटी रुपयांचे एअरबस एच 145 हेलिकॉप्टर असून हे हेलिकॉप्टर घेणारे ते पहिले भारतीय आहेत.
जगभरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानाचा विचार केला तर यामध्ये पुण्यातील ट्रम्प टॉवर मधील लक्झरी कोंडो सह अनेक घरांचा समावेश आहे. एवढेच नाही तर पंचतारांकित हॉटेल्स मध्ये रवीजा अष्टमुडी, रवीजा कोवलम आणि रवीजा कडवू यासारख्या हॉटेलचा देखील समावेश आहे. तसेच अनेक रिअल इस्टेट उपक्रम व बँकांमध्ये देखील त्यांचा हिस्सा असून कोल्लममध्ये त्यांचे 300 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे.
या सगळ्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यातीलच एक सन्मान म्हणजे 2008 मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले व 2010 मध्ये त्यांना भारत सरकारच्या माध्यमातून पद्मश्री पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
अशा पद्धतीने रवी पिल्लई यांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आणि अगदी गरिबीच्या परिस्थितीतून स्वतःचे साम्राज्य उभे केले व आज ते केरळ मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.