Samruddhi Highway : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या मार्फत करण्यात येणार असून, दिनांक २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सदर गॅन्ट्री उभारणीचे काम समृद्धी महामार्गावरील किमी ९०+५०० ते किमी १७०+४०० या दरम्यान करण्यात येणार आहे. या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांचा तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्याचा समावेश आहे.

महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ही गॅन्ट्री उभारली जात आहे. गॅन्ट्री उभारणीचे काम एकूण १२ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
प्रत्येक टप्प्यात काम सुरू असताना संबंधित ठिकाणाजवळील एका बाजूची म्हणजेच मुंबई किंवा नागपूर दिशेकडील वाहतूक सुमारे ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या बाजूची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येईल, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या कामामुळे पठाणपूर (ता. धामणगाव रेल्वे), धोत्रा व खंबाळा (ता. चांदूर रेल्वे), शेलू नटवा, पाचोड व वाढोना रामनाथ (ता. नांदगाव खंडेश्वर) तसेच निंबा जहागीर व धानोरा ताथोड (ता. कारंजा लाड, जि. वाशीम) या परिसरात ठराविक दिवशी व ठराविक वेळेत वाहतूक बंदी लागू राहणार आहे.
या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि वाहतूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सहकार्य केल्यास हे काम सुरक्षित आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.













