नांदेडच्या MBA ‘शेती’वाल्याचा नादखुळा ! एका एकरात ‘या’ जातीच्या पेरूची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली; 4 लाखांची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्याच हृदय विदारक चित्र. पण मराठवाड्याचे हे वास्तव आता नवयुवकांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवयुवक तरुण शेतकऱ्यांनी आता भयान दुष्काळाचा सामना करत नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमधून लाखोंची कमाई करण्याची किमया साधण्यास सुरुवात केली आहे.

मराठवाड्यातील अनेक तरुणांनी शेतीमधल्या आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण सिद्ध करून दाखवला आहे. आज आपण नांदेड जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने शेतीमध्ये केलेला भन्नाट प्रयोग जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे कामळज येथील एमबीए झालेल्या तरुणाने नोकरी ऐवजी शेतीलाच प्राधान्य देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.

मुरलीधर खानसोळे असे या तरुणाचं नाव असून मुरलीधर आपल्या एक एकर शेत जमिनीत सध्या शेती करत आहेत. मुरलीधर यांनी आपल्या एका एकरात पेरूची लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही पेरूची बाग सेंद्रिय पद्धतीने जोपासण्याचा निर्णय घेतला आहे. रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय खतांच्या माध्यमातून त्यांनी पेरूपासून उत्पादन मिळवून दाखवले आहे.

मुरलीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी व्ही एन आर या जातीच्या पेरूची आपल्या एक एकर जमिनीत लागवड केली. दहा बाय सात फूट अंतरावर पेरूच्या रोपांची लागवड करण्यात आली. म्हणजेच एका एकरात 700 रोपे लावली. विशेष म्हणजे स्वतः सेंद्रिय खत तयार करतात आणि तेच आपल्या पेरूच्या बागेला लावतात. गेल्या चार वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग जोपासत असून आता त्यांना वर्षाकाठी या एका एकरातून साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

त्यांनी लागवड केलेल्या या पेरूच्या बागेतून वर्षातून दोनदा उत्पन्न त्यांना मिळतं आणि अशा पद्धतीने दोनदा मिळालेल्या उत्पन्नातून त्यांना चार लाखांपर्यंतची कमाई होत आहे. मुरलीधर सांगतात की जवळील तेलंगणा राज्यात या पेरूला मोठी मागणी आहे. म्हणून त्यांचा बहुतांशी पेरू हा तेलंगणामध्ये विक्री होतो. निश्चितच मराठवाड्यातील या तरुण आणि उच्चशिक्षित शेतकऱ्याने शेतीमध्ये साधलेली ही प्रगती इतर तरुणांना मार्गदर्शक राहणार आहे.