Success Story: ग्रामीण भागातील ही महिला बनली अधिकारी! वाचा वंदनाताईंचा गृहिणी ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story:- स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे प्रचंड प्रमाणात अभ्यास, अनेक महागडे क्लासेस इत्यादी डोळ्यासमोर येते. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये जर यश मिळवायचे असेल तर एक निश्चित दिशेने केलेले प्रयत्न आणि अफाट अभ्यास या बाबी अपरिहार्य असतात. यातील बरेच जण असे असतात की अगदी शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता  कामातून मिळालेल्या वेळेत व्यवस्थित अभ्यास करून या परीक्षांमध्ये यश मिळवतात.

सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी किंवा यूपीएससी या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उज्वल यश मिळवताना दिसून येत असून यातील बरेच विद्यार्थी कुठल्याही कोचिंग क्लासेस विना या परीक्षेत यश मिळवत आहेत. या यशामागे निश्चितच असा विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रचंड प्रमाणात अभ्यास तसेच व्यवस्थित नियोजन करून केलेले प्रयत्न, ध्येय गाठण्यासाठी आवश्यक सातत्यपूर्ण प्रयत्न  इत्यादी गुण खूप महत्त्वपूर्ण ठरतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील वंदना गायकवाड यांचा विचार केला तर अनेक अडचणींचा सामना करत स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेले यश आपल्याला उदाहरणादाखल घेता येईल. या अनुषंगाने या लेखात आपण अधिकारी झालेल्या निफाडच्या वंदना गायकवाड यांची यशोगाथा पाहणार आहोत.

 निफाडच्या वंदना गायकवाड यांचे यशोगाथा

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वंदना गायकवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. ते मूळचे ओझर येथील  शेतकरी अशोक शिंदे यांच्या कन्या असून निफाड तालुक्यातील शिरवाडे या ठिकाणी त्यांचे सासर असून गायकवाड कुटुंबात त्यांचे लग्न झालेले आहे. सासरी लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी हे यश मिळवले.

संसार यशस्वीपणे सांभाळत त्यांनी नोकरी देखील केली व या सगळ्या जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांची देखील तयारी केली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवित यश मिळवले. यावर्षी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सहाय्यक संचालक,

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, राजपत्रित वर्ग दोन, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्रशासन या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. घरातील सगळे काम व नोकरी सांभाळत व या सगळ्या व्यापातून जो काही मोकळा वेळ मिळाला त्याचा त्यांनी सदुपयोग केला व व्यवस्थित अभ्यास करून या परीक्षेमध्ये यश मिळवले. त्यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.

 वंदना गायकवाड यांच्या पतीचे साथ ठरली मोलाची

जर वंदना गायकवाड यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे प्राथमिक शिक्षण हे ओझर या ठिकाणी असलेल्या अभिनव बाल विकास मंदिर या ठिकाणी झाले व माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नाशिक शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला व पुढचे शिक्षण त्यांनी अमरावती या ठिकाणाच्या शासकीय महाविद्यालयात घेऊन 2015 मध्ये डिग्री प्राप्त केली.

अगदी सुरुवातीपासून अभ्यासात हुशार असलेल्या  वंदना यांनी लग्नानंतर मात्र घरचा संसार व्यवस्थितपणे सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली व लग्नानंतर देखील मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. या सगळ्या कार्यामध्ये त्यांचे पती अमोल यांची मोलाची साथ लाभली. अमोल हेदेखील उच्चशिक्षित असून ते केएसबी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.

अगोदर देखील त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या होत्या परंतु त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले नव्हते. परंतु अपयश आल्याने खचून न जाता प्रयत्नांमध्ये आणि अभ्यासात सातत्य ठेवले व हे यश संपादन केले. 31 ऑगस्ट रोजी लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात त्यांनी हे घवघवीत यश मिळवले.

यावरून आपल्याला दिसून येते की माणसाचा दैनंदिन रुटीन हा कितीही व्यस्त असला तरी मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध आणि योग्य दिशेने प्रयत्न केले तर यश मिळतेच.