बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी बीडमध्ये खजूराची यशोगाथा: दीड एकरात १०–१२ लाखांचे उत्पन्न,

Published on -

Successful Farmer : बदलत्या काळात शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक फायदेशीर व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. वाढते उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, सततचा दुष्काळ आणि पाण्याची टंचाई यामुळे पारंपारिक पिकांवर अवलंबून राहणे अनेक शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरत आहे.

त्यामुळेच आता अनेक शेतकरी नगदी, कमी पाण्यात येणाऱ्या आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. या बदलत्या प्रवाहात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील दत्तात्रेय घुले यांचा खजूर लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी गाव हे कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखले जाते. याच भागात राहणाऱ्या दत्तात्रेय घुले यांची पारंपारिक पिके हवामानाच्या लहरीपणामुळे वारंवार फसत होती.

कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळामुळे शेतीत तोटा होत असल्याने त्यांनी पर्यायी पिकांचा सखोल अभ्यास केला. विविध राज्यांतील यशस्वी प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी खजूर लागवडीचा धाडसी निर्णय घेतला.

घुले यांनी अवघ्या दीड एकर क्षेत्रात सुमारे ८० खजूराची झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ‘बार्ली’ जातीच्या खजूराची निवड केली आहे, जी उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी ओळखली जाते.

या पिकाला तुलनेने कमी पाण्याची गरज असते आणि दुष्काळी हवामानातही ते चांगले उत्पादन देते. योग्य निगा, खत व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे आज त्यांच्या शेतातून दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

खजूर लागवडीत दोन झाडांमधील अंतर साधारण २५ x २५ फूट ठेवले जाते. एका एकरात सुमारे ६५ झाडे लावता येतात. प्रत्येक झाडापासून १८० ते २०० किलोपर्यंत फळे मिळतात. बाजारात या खजुराला मोठी मागणी असून एका झाडामागे १५ ते २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे कमी क्षेत्रातही शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

मात्र, या लागवडीसमोर काही अडचणीही आहेत. बार्ली जातीच्या एका रोपाची किंमत ४ ते ४.५ हजार रुपये असल्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी सुरुवातीचा खर्च मोठा ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाकडे अनुदानाची मागणी होत आहे.

गुजरात व राजस्थानमध्ये ज्या प्रकारे खजूर लागवडीसाठी अनुदान दिले जाते, तशीच सुविधा महाराष्ट्रातही मिळाल्यास दुष्काळी भागातील शेतीला नवी दिशा मिळू शकते, असे मत दत्तात्रेय घुले यांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News