Sugarcane Farming : बातमी कामाची ! ऊसाची ‘ही’ नवीन जात शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान; वाचा याच्या विशेषता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : राज्यात ऊस या बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. यामुळे गाळप हंगाम यंदा लवकरच आटोपणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी उसाच्या एका नवीन जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण उसाच्या एमएस (MS) १४०८२ या जाती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उसाची ही नवीन जात फुले २६५ आणि कोएम ०२५४ या दोन जातीच्या संकरातून तयार करण्यात आली आहे. ही सुधारित जात अधिक उत्पादन देण्यास सक्षम असून यामुळे चांगले ऊस उत्पादन आणि साखरेचा उतारा लाभत आहे.

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या लागवडीतून सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन इतके दर्जेदार उत्पादन मिळवता आले आहे. साखर उत्पादनाचा जर विचार केला तर या जातीपासून सुरु हंगामात १८.४४ टन प्रति हेक्टर, पूर्व हंगामात 19.40 टन प्रति हेक्टर, आडसाली हंगामात 20.53 टन प्रति हेक्टर, तसेच खोडवामध्ये साखर उत्पादन 17.10 टन प्रती हेक्टर या पद्धतीने मिळाले आहे.

निश्चितच, उसाचे उत्पादन आणि साखरेचे उत्पादन याबाबतीत ही जात इतर जातीच्या तुलनेत बऱ्याच अंशी सरस आढळून आली आहे. विशेष म्हणजे तज्ञ लोकांनी ही जात पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात नव्याने विकसित झालेल्या या जातीची लागवड करणे शक्य असून या राज्यात या जातीची लागवड शिफारशीत आहे.

एमएस (MS) १४०८२ जातीच्या विशेषता खालील प्रमाणे :-

नव्याने विकसित झालेली ही जात ऊस उत्पादनात आणि साखर उत्पादनात को ८६०३२ या जातीपेक्षा किंचित सरस आढळून आली आहे.

या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही जात तिन्ही हंगामात म्हणजेच सुरू पूर्व आणि अडचणी हंगामात उत्पादित केली जाऊ शकते.

या जातीपासून चांगला खोडवा मिळतो. तसेच लालकूज, काणी, मर, पिवळा पानांच्या रोगास प्रतिकारक्षम, तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्का बोइंग रोगांना प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या खोड कीड, कांडी कीड व लोकरी मावा किडींना कमी बळी पडणारी जात म्हणून या जातीला शिफारशीत करण्यात आले आहे.

क्षारयुक्त जमिनीत देखील ही जात उत्पादन देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. या जातीच्या उसाला तुरे निघण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. निश्चितच ही जात राज्यातील ऊस उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.