Farmer Success Story: योग्य नियोजन करून खडकाळ जमिनीवर फुलवला डाळिंबाचा मळा; 3 एकरमध्ये मिळवले 1 कोटी रुपये उत्पन्न

Ajay Patil
Published:

Farmer Success Story:- पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीच्या आधुनिक पद्धत आणि वेगवेगळ्या फळबागा व भाजीपाला पिकांची लागवड व या पिकांच्या व्यवस्थापनामध्ये केलेला तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकरी आता कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यामध्ये यशस्वी होताना दिसून येत आहेत.

साधारणपणे गेल्या दशकापासून जर आपण पाहिले तर भारतीय शेतीचे स्वरूप पूर्णपणे पालटलेले असून मोठ्या प्रमाणावर फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल आपल्याला दिसून येतो. फळबागांमध्ये डाळिंब, सिताफळ, पेरू, अगदी अलीकडच्या काळातील ड्रॅगन फ्रुट तसेच स्ट्रॉबेरी, इतकेच नाही तर सफरचंदाची लागवड देखील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात यशस्वी केलेली आहे.

हे सगळे शक्य झालं ते तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक पद्धतींच्या वापरामुळे. याच पद्धतीने जर आपण बीड जिल्ह्यात असलेल्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग या गावचे विलास अण्णासाहेब जगताप या दहावी पास असलेल्या तरुण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर खडकाळ जमिनीवर तीन एकरात या शेतकऱ्याने भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली व या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

 डाळिंब शेतीतून मिळवले एक कोटीचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या टाकळसिंग या गावचे विलास अण्णासाहेब जगताप हे दहावी पास असलेले तरुण शेतकरी आहेत. परंतु पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिकतेची कास धरली व डाळिंब लागवड करण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी तीन एकर असलेल्या खडकाळ जमिनीवर डाळिंब लागवड करण्याचे ठरवले व भव्य डाळिंबाची लागवड केली.

हि लागवड साधारणपणे 2017 या वर्षी त्यांनी केली व एकूण 1100 रोपे लावण्यात आली. जमीन खडकाळ असल्यामुळे लागवडीसाठी 12 बाय 8 हे अंतर वापरले व पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा कौशल्यपूर्ण वापर करून पाण्याची सोय केली. लागवडीनंतर मात्र व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हवे ते सगळे उपाययोजना अगदी चोख आणि वेळेत पार पाडल्या.

या सगळ्या डाळिंबासाठी सात वर्षात त्यांना डाळिंब लागवड, त्यासाठी करावे लागणारे पाणी व्यवस्थापन, विविध कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी औषध व फवारणीचा असा एकूण खर्च पाच लाख रुपये आला. परंतु 2017 ते 2024 या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले व सोलापूर, सांगोला तसेच मुंबई, पुणे व नगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी डाळिंबाची विक्री केली व काही विक्री ही जागेवरच झाली.

गेल्या सात वर्षाच्या कालावधीत त्यांनी या डाळिंब शेतीतून एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. डाळिंबामधून चांगला पैसा मिळत असल्यामुळे त्यांनी या शेतीकडे बारकाईने लक्ष दिले व हे यश मिळवले. या व्यवस्थापनामध्ये त्यांनी प्रामुख्याने फवारणी आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष पुरवले.

त्यांनी म्हटले की डाळिंब बागेला फक्त लागवड करताना जास्त खर्च करावा लागतो. परंतु तुम्ही कुठलीही फळबाग किंवा कुठलेही पीक घेतले आणि योग्य नियोजन केले तर  शेतीमध्येच तुम्हाला मोती दिसून आल्याशिवाय राहणार नाही असं देखील विलास जगताप सांगतात.

सोशल मीडियावरील अचूक माहितीचा वापर करत जर मिळालेले ज्ञानाचा उपयोग करून आधुनिक शेती केली तर शेतकऱ्याला मजूर नव्हे तर मालक बनता येते व त्यामुळे जास्तीत जास्त तरुण शेतकऱ्यांनी फळबागच्या शेतीकडे वळावे असा देखील मोलाचा सल्ला ते तरुण शेतकऱ्यांना देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe