Voter Card News : मतदार नोंदणी अधिकाऱ्याने अर्ज मंजूर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संबंधित मतदाराला मतदार ओळखपत्र (EPIC) मिळावे, असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. तसेच मतदार यादीतील समान छायाचित्रे असलेले मतदार शोधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, याद्वारे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि त्रुटीविरहित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राज्यस्तरीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना चोक्कलिंगम यांनी भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत वेळोवेळी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या जात असल्याचे सांगितले.

आचारसंहिता, छायाचित्रयुक्त मतदार यादी, ईव्हीएम, निवडणूक निरीक्षक व्यवस्था आणि मतमोजणी प्रक्रिया या संकल्पना याच सुधारणांचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा देण्यात येत असून, अपात्र व्यक्ती मतदार यादीत राहणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना येणाऱ्या अडचणींची प्रशासनाला जाणीव आहे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि राज्य निवडणूक आयोग या स्वतंत्र संस्था असून, भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनंतर मतदार नोंदणी व लोकप्रतिनिधित्व कायदा अस्तित्वात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही आणि विकास यांचा घनिष्ठ संबंध असून, शाश्वत विकासासाठी मजबूत लोकशाही आवश्यक असल्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भारतीय निवडणूक व्यवस्था अतिशय पारदर्शक व शिस्तबद्ध असल्याचे सांगितले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ते निवडणूक निर्णय अधिकारी सर्वजण प्रामाणिकपणे काम करतात, असे त्यांनी गौरवोद्गार काढले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमात मतदारविषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला शांतारामबापू वावरे महाविद्यालय आणि केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.













