Successful Farmer: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता उत्पन्नवाढीचे अनुषंगाने औषधी पिकाची (Medicinal Plant Farming) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. औषधी पिकाची शेती करून शेतकरी बांधव पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न (Farmer Income) मिळवत आहेत.

उत्तर प्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील तुळशी या औषधी पिकाची शेती (Farming) करून अवघ्या तीन महिन्यात लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यातील हर्दोई जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. खरं पाहता, हरदोई जिल्हा ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव ऊस या नगदी पिकातून (Cash Crop) चांगली कमाई देखील करत आहेत.

मात्र जिल्ह्यातील मौजे निर येथील अभिमन्यू यांनी शेतीत (Agriculture) जरा हटके करण्याच्या विचाराने तुळशी औषधी वनस्पतींची शेती (Tulsi Cultivation) सुरु केली आहे. अभिमन्यू यांनी आपल्या एक हेक्‍टर शेतजमीनीत तुळशी पिकाची लागवड केली आहे. या शेतीतून कमी दिवसातच पारंपरिक पिकांपेक्षा अधिक कमाई होत असल्याचा अभिमन्यू यांचा दावा आहे.

अभिमन्यू यांनी त्यांच्या शेजारी जिल्ह्यात सीतापुर येथे एकदा तुळशीची शेती बघितली. मग काय त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी तुळशीच्या शेतीविषयी विचारपूस केली आणि त्यांनीदेखील तुळशी लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेतला. आज अभिमन्यू यांना तुळशीची शेती विशेष लाभप्रद सिद्ध होत आहे.

तुळशीच्या तेलाला आहे चांगली मागणी:- या प्रयोगशील शेतकऱ्याने माहिती देतांना सांगितले की, तुळशीची लागवड वालुकामय जमिनीत करता येते. मात्र तुळशी लागवड करण्यापूर्वी शेतात पाणी साचणार नाही तसेच साचलेले पाणी काढण्याची योग्य व्यवस्था करणे अतिआवश्यक आहे.

जाणकार लोकांच्या मते, तुळशीची ओसीमम बॅसिलिकम ही एक उत्तम प्रजाती आहे. ही प्रजाती तेल उत्पादनासाठी खूपच चांगली मानली जाते. मित्रांनो तुळशीचे तेल हे मुख्यतः परफ्यूम आणि औषधांसाठी वापरले जाते. कॉस्मेटिक उद्योगात तुळशीच्या तेलाची मागणी मोठी आहे. जून-जुलैमध्ये लावलेले तुळशीचे पीक हिवाळ्याच्या वेळेस चांगल्या स्थितीत येते.

शेणखत वापरणे ठरते फायद्याचे:- मित्रांनो तुळशीची शेती सुरू करण्यापूर्वी पूर्वमशागत आवश्‍यक असते. यासाठी शेत तयार करताना हॅरो कल्टिव्हेटरने सुमारे 20 सें.मी.पर्यंत जमीन नांगरली जाते. नांगरणी नंतर जमिनीत शेणखताचा वापर केला जातो. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.

एका हेक्टरमध्ये सुमारे 20 टन शेणखत वापरले जाते. बेड तयार करून 10 सेमी अंतरावर बियाणे किंवा तुळशी रोपे लावली जातात. साधारण 15 ते 20 दिवसात बियाणे अंकुरते. कोरड्या हंगामात दुपारनंतर शेताला पाणी दिले जाते आणि पाऊस व्यवस्थित सुरू राहिल्यास सिंचनाची गरज भासत नाही.

जाणकार लोकांच्या मते, तुळशीच्या पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी तुळशी पिकात दर चार आठवड्यांनी निंदणी केली पाहिजे. एक हेक्टर तुळशीच्या पिकातून सुमारे 100 किलो ग्रॅम तुळशीचे तेल मिळते आणि जवळपास 2000 रुपये प्रति लिटर तेलाची किंमत असते. म्हणजे अवघ्या तीन महिन्यात एक हेक्‍टर क्षेत्रातून शेतकरी बांधवांना दोन लाखांचे उत्पन्न मिळते.