‘भारत तोडो’ला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या…

Maharashtra news : ‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील ८ वर्षांत जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या,’ असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित आहेत.

दुपारच्या सत्रात राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे उद्या सादरीकरण होईल.