Maharashtra news : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाजबाबत योग्य ते संशोधन करुन मगच याचिका दाखल करा, अशा शब्दांत अलाहबादच्या उच्च न्यायालयायाने याचिकाकर्ते व भाजपचे नेत्यांना फटकारले आहे.

ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून तेथे शिवमंदीर असल्याचा दावा केला जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे कळू शकेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या याचिकेवर आज अलाहबादच्या उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश डीके उपाध्याय यांनी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत जनहित याचिकांच्या व्यवस्थेचा दुरुपयोग न करता आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, विद्यापिठात जाऊन पीएचडी करा आणि मग कोर्टात या, असा सल्ला दिला आहे.

उद्या तुम्ही येऊन न्यायाधीशांच्या कक्षेत जाण्याची परवानगी मागाल. असे कसे चालेल? तुम्हाला ज्या विषयाबाबत काही माहिती नाही त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी अभ्यास किंवा संशोधन करण्यापासून रोखले तेव्हा कोर्टाकडे न्याय मागू शकता, अशा कठोर शब्दांत कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे.