अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- ज्या काळात सावित्रीबाईंनी क्रांतीकारक कार्य सुरु केले तेव्हाचा समाज मागासलेला होता, अंधश्रद्धेत अडकलेला होता, कट्टर होता म्हणून महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा देत सावित्रीबाईंनी कार्य सुरु केले आणि ते संपले असे आपण समजत असू तर आजही सावित्रीची लढाई संपलेली नाही.

स्वत:ला सावित्रीची लेक किंवा सावित्री म्हणून घेणे सोपे आहे; मात्र त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणे अवघड आहे. ते स्वीकारणार्‍या आजच्या सावित्रीबाई व लेकिंवर सुद्धा सोशल मीडियातून चिखलफेक होतांना दिसत आहे.

आजही दगड-धोंडे फेकणारे आहेत आणि अनेक स्त्रियांना आपापल्या न्याय हक्कासाठी लढाई लढावीच लागत आहे. म्हणून सावित्रीची लढाई संपलेली नाही, अनेक प्रश्नांवर अनेक लढाया लढावे लागतील, असा इशारा असंघटीत श्रमिक महिलांच्या नेत्या कॉ. स्मिताताई पानसरे यांनी दिला.

जिज्ञासा अकादमी, विचारधारा आणि सहभागी संस्था राष्ट्र सेवा दल, प.पु. रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती, महारष्ट्र साखर कामगार महासंघ, महानगरपालिका कामगार युनियन, नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान, चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र, राज्य, रहेमत सुलतान फाउंडेशन,

गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, पीस फाउंडेशन, उर्जिता फाउंडेशन, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, पद्मशाली युवाशक्ती, नगर जल्लोष (ट्रस्ट) परिवार, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. आदींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सावित्री उत्सव आणि सावित्री फातिमा पुरस्कार वितरण समारंभाच्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्मिता पानसरे बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव देवढे होते तर मंचावर उदघाटक छायाताई फिरोदिया, स्वागताध्यक्ष अ‍ॅड.धनंजय कृष्णा जाधव, आयोजक विठ्ठल बुलबुले, राजेंद्र पवार, संजय खामकर, अ‍ॅड रवींद्र शितोळे, विवेक पवार, अजय म्याना हे मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉ. क्रांती अनभुले, ज्योत्स्ना शिंदे, संगीता जोशी, शीतल बांगर,विद्या दगडे, या पाच जणींना यावेळी सावित्री-फातिमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला प्रांगणात सावित्रीबाईना पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.

श्री.धनंजय जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून सावित्री उत्सव समितीच्यावतीने अहमदनगर शहरात सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यासाठी महापालिकेत पाठपुरावा करणार असून सावित्रीबाईचे कार्य व कर्तृत्व युवा-युवतींना कळावे म्हणून आम्ही 5000 पुस्तके ना नफा ना तोटा तत्वावर प्रकाशित करून वितरीत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी छायाताई फिरोदिया म्हणाल्या, असे कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देतात, आयोजन नियोजनातून माणसे घडतात. युवा पिढीला दिशा मिळते, महान व्यक्तिमत्वांची ओळख होते.असे त्या म्हणाल्या. प्राचार्य शिवाजीराव देवढे म्हणाले, सावित्रीबाईंच्या धाडसी प्रसंग सांगून आजच्या दांभिकपणे वागणार्‍या समजला खणखणीत अनेक सवाल केले.

समाजाने विज्ञान स्वीकारला मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारतांना दिसत नाही, आजही आपण आंतरजातीय, अंतर धर्मीय लग्न स्वीकारायला तयार नाही. सवित्रीबाईंनी त्याकाळी अशा लग्नासाठी पुढाकार घेतला होता, असेही ते म्हणाले. पुरस्कार प्राप्त डॉ. क्रांती अनभुले, ज्योत्स्ना शिंदे, संगीता जोशी, शीतल बांगर, विद्या दगडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रस्तावना प्रियांका सोनावणे यांनी केली. आयोजनामागची भूमिका विचार विठ्ठल बुलबुले यांनी मांडली. सूत्रसंचालन संगीता गाडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन इंजि. विजय ठुबे यांनी मानले.