अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ५० टक्के भरले आहे.

२६ हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा बुधवार (दि.२८) सकाळी सहा वाजता १३,८६५ दशलक्ष घनफूट (५३.३२ टक्के) झाला आहे.

लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ५,०१६ क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. मात्र धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पावसाअभावी खरिपाची पिके सुकून चालली आहेत. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगडावर मागील सहा-सात दिवसांपासून दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे.

त्यामुळे धरणात नवीन पाणीसाठा जमा होत आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील पाच वर्षांत सन २०१८ चा अपवाद वगळता धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.