Ahmednagar News : ट्रकमधून डिझेल चोरणार्‍यांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक विजय करे व पोलीस अंमलदारांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना आज पहाटे नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर घडली.

यात पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस अंमलदार जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर 10 टायर मालवाहतूक करणारी ट्रक बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. आज पहाटे ट्रकच्या बाजूला एक स्विप्ट कार उभी राहिली.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस अंमलदार पहाटेची गस्त घालत असतांना ट्रकमधील डिझेल काढतांना चोरटे दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता डिझेल चोरांनी आपली कार चालू करून पळून गेले.

निरीक्षक करे व पोलीस फौजफाट्याने चोरट्यांना पकडण्यासाठी 150 ते 200 किलोमीटर पाठलाग केला. नेवासा पोलिसांनी डिझेल चोरांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता निरीक्षक करे व पोलीस अंमलदाराच्यां अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडला.

यामध्ये निरीक्षक करे, उपनिरीक्षक भाटेवाल, पोलीस हवालदार अंबादास गिते, योगेश आव्हाड, बाळासाहेब खेडकर, रामदास वैद्य, संदीप म्हस्के चोरट्यांच्या झटापटीत जखमी झाल्याची घटना घडली. या डिझेल चोरी प्रकरणातील मध्यप्रदेशमधील रहिवासी असलेला एक आरोपी पकडण्यात नेवासा पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.