file photo

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- शहर, उपनगरात ऐन सणासुदीच्या काळात चोर्‍यामध्ये वाढ झाली आहे. सोमवारी रात्री, मंगळवारी पहाटे शहरातील कोतवाली , तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या.

याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, तपोवन रोडवरील सुर्यनगरच्या साईकृपा अपार्टमेंटमध्ये किसन एकनाथ लवांडे (वय 72) यांचे घरफोडून चोरट्यांनी एक लाख नऊ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी लवांडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरफोडीची दुसरी घटना बालिकाश्रम रोडवर घडली.या रोडवरील आकाश बिअर शॉप चोरट्यांनी फोडली.

तेथुन रोख रक्कम व बिअरचे कॅन असा 64 हजार 160 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी बंडु बाबुराव लेंडकर (रा. लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील बुरूडगाव रोडवरील इंपेरिअल चौकातील बॉम्बे चिकन शॉप फोडून 18 हजार रूपयांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी शेख गुलाम हबीब खलील अहमद (रा. सर्जेपुरा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, वाढत्या चोरी, घरफोडी, सोनसाखळी व बॅग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये खबराट पसरली आहे. मात्र चोरट्यांना अटक करण्यात शहर पोलिसांना अपयश आले आहे.