अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भिंगार छावणी परिषद हद्दीतील विविध प्रश्‍न सुटण्यासाठी छावणी परिषदेच्या अधिकार्‍यांसह संयुक्त बैठक घेऊन विविध प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावण्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी निवेदन दिले.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले पालकमंत्री यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सपकाळ यांनी भेट घेऊन भिंगारच्या प्रश्‍नाबाबत चर्चा केली. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने भिंगार शहरातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यात आले आहेत.

सध्या काही प्रश्‍न प्रलंबीत असून, ते सोडविण्यासाठी छावणी परिषदचे अधिकारी यांची आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेतल्यास स्थानिक पातळीवरचे विविध प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

रक्षा मंत्रालय कडून भिंगार कॅन्टोंमेंटला सर्विस चार्ज (फंड) निधी थकीत असून, यामुळे कामगारांचे वेतन काही महिन्यापासून थकित आहेत.

निधी नसल्यामुळे भिंगारचे प्रश्‍न सुटलेले नाही. भिंगार शहराची लोकसंख्या वाढत असताना क्षेत्र मर्यादित आहे. चटईक्षेत्राच्या नियमामुळे नागरिकांना दुमजली घरे बांधता येत नाही.

परिणामे अनेक नागरिक घरापासून वंचित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भिंगार चटई क्षेत्राचे एफएसआय वन प्लस थ्री होण्यासाठी केंद्र सरकार व रक्षा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सपकाळ यांनी निवेदनाद्वारे केली.

तसेच आरोग्य, स्वच्छता व पाणी प्रश्‍नाबात स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन प्रश्‍न सुटण्यासाठी छावणी परिषदच्या अधिकार्‍यांसह बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे सपकाळ यांनी निवेदनात म्हंटले आहे.