ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे.

राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे.

कोर्टाच्या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत.

तसेच ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुका आता लवकर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयानंतर राजकीय पक्ष ओबीसी उमेदवारांबाबत काय रणनीती आखतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्वी आरक्षित असलेल्या ओबीसींच्या मतदारसंघात ओबीसींना प्रतिनिधीत्व देणे किंवा ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रमाणात ओबीसी उमेदवारांना तिकीट देणे हाच पर्याय राजकीय पक्षांसमोर आहे.