सध्या देशात उष्णतेची लाट सुरु आहे. अनेक ठिकाणी तापमानाने 40 अंशाची पातळी ओलांडली आहे. या वाढत्या तापमानामुळे लोक देखील हैराण झाले आहेत. या  वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान सुधारित वेळेनुसार आता शाळा सकाळी 6 ते 9 या वेळेत भरवण्यात येणार आहे. शासनाचा हा आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य भारत आणि पश्चिम राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेटी लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शास्त्रज्ञ काय म्हणतायत ? जाणून घ्या शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांच्या मते, पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. पश्चिम राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा काही भाग वगळता पुढील पाच दिवस देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही, असे जेनामनी यांनी सांगितले.

राजस्थानच्या बिकानेरमध्ये तापमानाचा पारा 47.1 अंश सेल्सिअस, गंगानगरमध्ये 46.9 अंश सेल्सिअस, तर बारमेरमध्ये 46.8 अंश सेल्सिअस आणि फलोदीमध्ये 46.6 अंश सेल्सिअस होता. महाराष्ट्राच्या विदर्भातील ब्रम्हपुरीमध्ये 46.2, चंद्रपूरमध्ये 46 अंश सेल्सिअस होता.