बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एलआयसीचा आयपीओ विक्रीसाठी आजपासून उपलब्ध झाला आहे. हा आयपीओ विक्रीसाठी खुला झाल्यानंतर गुंतवणूकदार त्यावर तुटून पडले. पहिल्या अवघ्या दहा मिनिटांमध्ये १७ लाख शेअर्ससाठी बोली लावण्यात आलीय.

एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय. देशातील आतापर्यंताचा सर्वात मोठा आयपीओ सकाळी दहा वाजता सबक्रीप्शनसाठी खुला करण्यात आला.

पहिल्या चार तासांमध्येही चार टक्के सबस्क्रीप्शन झालं. यामध्ये १६ कोटी २० लाख ७८ हजार ६७ शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत.

त्यापैकी ७० लाख ६१ हजार ९७० शेअर्ससाठी बोली लावण्यात आलीय. कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला भाग हा १० टक्के, रिटेल पोर्शन आठ टक्के आणि एचएनआय पोर्शन दोन टक्के सबस्क्राइब झालाय.

दरम्यान या आयपीओच्या माध्यमातून १६ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे शेअर्स सरकारने विक्रीसाठी काढले आङेत.

केंद्र सरकारने त्यांच्या मूळ योजनेप्रमाणे पाच टक्क्यांऐवजी फक्त ३.५ टक्के भांडवली हिस्सा विकून या ‘आयपीओ’मधून २१,००० कोटींचा निधी उभारू पाहत आहे.सरकारच्या हिस्सा विक्रीत कपात झाली असली तरी देशाच्या भांडवली बाजारातील ही आजवरची सर्वात मोठी सार्वजनिक भागविक्री ठरणार आहे.

कंपनीने भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना बुधवारपासून (४ मे) पुढील सोमवार ९ मेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

एलआयसीच्या ‘आयपीओ’मध्ये विदेशातून गुंतवणूकदारांच्या सहभागाबाबत एकंदर साशंकता होतीच, त्याप्रमाणे सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये जवळपास ८० टक्के भरणा हा देशी गुंतवणूकदार संस्थांकडून झाला आहे.