प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ हाेत नाही ! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ हाेत नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने २५ वर्षीय तरुणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला आहे. मुलीनेही गाडीत बसण्यास विरोध केला नाही. तसेच, या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत.

यावरून आरोपीने अपहरण व विनयभंग केल्याचे सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. एका मुलाने १७ वर्षीय मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले व लग्नास मागणी केली.

या प्रकरणात आईने दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३६३ (पळवून नेणे) आणि ३५४ (ड) विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ११ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला होता.

तरुणाच्या वतीने न्यायालयात अॅड. श्रीधर एस. हुद्दार यांनी बाजू मांडली. अॅड. श्रीधर हुद्दार युक्तिवादात म्हणाले की, आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आहे.

त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत ही घटना येत नाही. यावेळी त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. वाढदिवसाच्या दिवशी आणि त्यापूर्वीही त्याने प्रेम व्यक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.