अहमदनगर ब्रेकींग: सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एक जखमी

Ahmednagarlive24 office
Updated:

शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे.

घर मालक साहेबराव भागाजी खेसे (वय 50 रा. निंबळक ता. नगर) व कामगार अरूण श्रीधर साठे (वय 38 रा. नागापूर) असे मृतांची नावे आहेत. तर कामगार अशोक साठे (रा. नागापूर) जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

नगर तालुक्यातील निंबळक शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निंबळक मधील पांडूरंग नगर परिसरात साहेबराव खेसे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सेफ्टी टँक भरल्यामुळे त्यातील मैला काढण्यासाठी त्यांनी रविवारी दुपारी दोन कामगारांना बोलविले होते.

टँकमधील मैला काढत असताना एक कामगार टँकमध्ये पडला. त्यापाठोपाठ दुसरा कामगारही टँकमध्ये पडला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मालक साहेबराव टँकमध्ये पडले. त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आले.

मालक साहेबराव व कामगार अरूण साठे यांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती निंबळक शिवारात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe