थकीत कर भर अन्यथा कारवाईला सामोरे जा… राहाता नगरपालिकेचा गाळेधारकांना इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  कर न भरणार्‍या गाळेधारकांना राहाता नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचल्याने थकित कर भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरिता गाळेधारकांनी प्रशासकाकडे मागणी केली आहे

तर कारवाईच्या भीतीपोटी अनेक गाळे व मालमत्ताधारक यांनी थकीत कराची रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ 29 डिसेंबरला संपला.

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण व ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढत चाललेला प्रादूर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या.

त्यामुळे राहाता शहरात प्रशासक म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान चव्हाण यांनी कर न भरणार्‍या गाळेधारक व मालमत्ता धारक यांच्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली.

करोना काळातील दोन वर्षांचे गाळे भाडे माफ करावे, भाडे रकमेतील बिलात लावलेली जीएसटी रक्कम माफ व्हावी, थकबाकी बिलात दरमहा आकारणी केलेली 2 टक्के व्याजाची रक्कम माफ करावी तसेच थकित असलेले गाळेभाडे भरणा करण्यासाठी हप्ता करून मिळावा, अशा मागण्या गाळेधारकांनी प्रशासनाला केल्या.

तर गेल्या अनेक वर्षांपासून काही गाळेधारक व मालमत्ताधारक यांच्याकडे पालिकेची करोडो रुपयांची थकबाकी आहे. सदर थकबाकी जमा होत नसल्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून

कंत्राटी कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी व कार्यालयाची देखभाल व इतर किरकोळ खर्च करणे मुश्किल झाले आहे. नगरपरिषदेच्या एकूण कर मागणीच्या तिप्पट थकबाकी गाळे व मालमत्ताधारक यांच्याकडे असल्याने

प्रशासनाने गाळे व मालमत्ताधारकांना थकित कराच्या रकमेचा भरणा तात्काळ करावा, असे वारंवार सांगण्यात आले. मात्र थकीत रक्कमेचा भरणा न केल्याने पालिका प्रशासनाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली.

या कारवाईत 4 दुकाने सील केले आहे. यामुळे थकीत असलेली कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe