शिक्षक बँक : सत्ताधाऱ्यांचे आत्मक्लेष तर विरोधकांचे घंटानाद आंदोलन..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  गुरुमाऊली मंडळाच्या अध्यक्षांनी स्वमंडळाच्या चेअरमनने बँकेत चालवलेला भ्रष्टाचार पाहून आत्मक्लेष करण्याचे जाहीर केले. हे नसलेला मोठेपणा दाखवण्याचा केविलवाणा प्रयोग आहे.

असे प्रतिपादन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी केले . गुरुकुल मंडळाच्या वतीने छेडलेल्या घंटानाद आंदोलनात शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन केले.

यावेळी ते म्हणाले की,संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनमध्ये लाखो रुपये लाटले. त्या वेळेस हेच गुरूमाऊलीचे अध्यक्ष मूग गिळून गप्प होते.

परंतू नवीन संगणक व सी.सी. टि. व्ही. खरेदी व्यवहारात पुरेसा वाटा न मिळाल्यामुळे अध्यक्षांना क्लेष झाला . त्यालाच आत्मक्लेष हे गोंडस नाव देऊन मी स्वच्छ असल्याचा आव ते आणत आहेत.

परंतू जिल्हापूढे यांचे पितळ उघडे पडले आहे. शिक्षक बँक ही सभासदांची असताना गुरुमाऊली मंडळाचे एक प्रमुख पदाधिकारी बँकेला खासगी मालमत्ता समजत आहेत.

शिपाई म्हणून बडतर्फ झालेल्या भावास क्लार्क म्हणून नोकरीत घेणे, त्यांच्या सोईच्या बदलीसाठी मांडवली करणे, बँकेच्या प्रशासनावर दबाब आणून त्याला वेतनवाढी देणे हे आत्मक्लेष करणाऱ्याला दिसत नाही का? गुरुमाऊली मंडळाचे राजकारण बँकेत क्लार्क असलेल्या एका नातलगाभोवतीच फिरत आहे. यांना सभासदांचे काही घेणे देणे नाही.

संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष होत आले आहे . या वाढीव मुदतीत संचालक मंडळाने अतिशय जबाबदारीने बँकहित जपणे महत्त्वाचे होते .परंतू संचालक कुणाचाही अंकुश अथवा धाक नसल्यासारखे निर्णय घेत सुटले आहेत .

प्रशासनही बँकेला व सभासद हिताला बाधा पोहचेल असे निर्णय होत असताना संचालक मंडळाला साथ देताना दिसत आहे . तरजास्त काळ पदाला चिटकून राहणे, सभासद नसताना बँकेच्या राजकारणात ढवळाढवळ करणे हा नैतिक भ्रष्टाचार आहे .

आपण लोकांना नकोसे होतो तेव्हा घरी बसणे हिताचे असते हे सेवानिवृत्त शिक्षकाला कोणी समजावून सांगावे? या संचालक मंडळाने तातडीने राजीनामे द्यावेत. अशी मागणी संजय कळमकर यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe