अद्यापही ‘ते’ सर्वजण तिच्याच प्रतीक्षेतच…!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा, महाविद्यालये अखेर सुरु झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

एकीकडे शाळा सुरु झाल्या असल्या तरी दुसरीकडे ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे महत्वाचे साधन असलेली एसटी मात्र अद्याप बंद आहे.

त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे?असा प्रश्न पालकांना पडला आहे. शाळेची घंटा वाजली परंतु एसटीची घंटी वाजणार तरी कधी? असा सवाल पालकांसह विद्यार्थ्यांमधून केला जात असून कधी एकदा परत लाल परी गावात दाखल होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

ग्रामीण भागासाठी दळणवळणाचे महत्वाचे साधन असलेल्या एसटीला आधी कोरोना तर आता संपाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे गत दोन वर्षांपासून ग्रामीण भागात एसटीच पोहचली नाही.

त्यामुळे आता संप मिटून एसटी ग्रामीण भागात कधी सुरु होणार याची प्रतिक्षा प्रवाशांना आहे. करोनामुळे बंद असलेल्या बसेस कोरोना संसर्ग कमी होताच सुरु होत असतानाच दिवाळी नंतर एसटी कर्मचार्‍यांनी संप सुरु केला.

गत तीन महिन्यांपासून कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर ठाम आहेत,परंतु शासन पातळीवर संपा वर अजूनही काही तोडगा न निघाल्याने संप सुरुच आहे.

त्याचा परीणाम सर्व सामान्यांच्या जीवनावर होत आहे.लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे.यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.