अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :-भुमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले.
यावेळी तृप्ती देसाई यांनी सांगितले की, राज्य सरकार मधील तीन राजकीय पक्ष व विरोधीपक्ष सध्या एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहे.

सध्या सुरु असलेला हा तमाशा राज्याच्या अजिबात हिताचा नाही. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील भाजपच्या पुढाऱ्यांना सुबुध्दी द्यावी याकरीता शनिदेवाला प्रार्थना केली.दरम्यान त्यांनी केलेली हि प्राथर्ना सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरू लागली आहे.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शनिशिंगणापूर येथे येवून मी शनिमूर्तीचे दर्शन घेतले. सामाजिक जबाबदारी म्हणून यापुढे भुमाता महिला ब्रिगेडचा लढा बलात्कार मुक्त महाराष्ट्रसाठी असणार आहे.
राज्यात लोकहिताचे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना सरकार व विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्यात सुरु असलेला तमाशा फक्त करमणूक आहे. लक्ष विचलित करण्याचा हा उद्योग लवकर थांबवा अन्यथा महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही असेही देसाई यांनी सांगितले.