अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितली.
त्यानुसार कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्च पर्यंत वेळ देऊन याचिका स्थगित केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती.
त्यांना कोर्टात हजर केले असता 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. याशिवाय ईडीने या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची,
आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने सुटका करण्याची मागणी मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत वेळ देत मलिकांची याचिका स्थगित केली आहे.