अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात तीन चोरट्यांनी शेतकर्याच्या घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करत 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान चोरट्यांच्या हल्ल्यात दादासाहेब पंढरीनाथ शिरसाठ (वय 64), त्यांची पत्नी शकुंतला दादासाहेब शिरसाठ (वय 60) व आई लक्ष्मीबाई पंढरीनाथ शिरसाठ (वय 88) हे तिघे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिरसाठ यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तीन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दादासाहेब, त्यांची पत्नी व आई घरासमोरील पत्र्याच्या पडवीत झोपले होते. तीन चोरट्यांनी मध्यरात्री पडवीत प्रवेश करून काही एक न बोलता लोखंडी रॉड, काठीने दादासाहेब,
त्यांची पत्नी व आईला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी 45 हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.













