गव्हाची निर्यातबंदी, केंद्र सरकारने का घेतला निर्णय?

Published on -

Maharashtra news : आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगण्यात येते. काही काळापूर्वी गोदामातून धान्य पडून असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र आता केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. कांद्याचे भाव कोसळलेले असताना गव्हातून दोन पैसे जादा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असताना निर्यातीबंदी करण्यात आल्याने भावावर परिणाम होणार आहे.

देशात गव्हाचे कोणतेही संकट नसून पुरेसा अन्नसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. अनियंत्रित व्यापार हे गव्हाच्या वाढत्या किमतींचे कारण असून महागाई रोखणे हे सरकारचे मुख्य लक्ष्य असल्याचे वाणिज्य सचिव बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांनी सांगितले आहे.

तरीही केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी आणली आहे. यासंदर्भात परकीय व्यापार महासंचालकांनी एक अधिसूचना जारी केली आहे. देशाची अन्नसुरक्षा, तसेच शेजारी देश आणि तुलनेनं दुर्बल देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गव्हाच्या निर्यात धोरणात सुधारणा केल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.

गव्हाच्या किमतीच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीचे नियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय गव्हाचे वितरण सुरू ठेवणार असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe