PM Kisan : केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या योजनेवर आणखी एक अपडेट आले आहे. कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, हवामानाचे संकट आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करण्यास तयार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल.
हवामानाच्या आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होतो
2022 मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबमध्ये जास्त पाऊस झाला होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये कमी पाऊस झाल्याने भात, कडधान्ये आणि तेलबिया या पिकांचे नुकसान झाले.
अलीकडे हवामानातील अनिश्चिततेच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आहुजा यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘अशा हवामान आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याने, देशातील असुरक्षित शेतकरी समुदायाचे निसर्गाच्या तडाख्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.’
या परिस्थितीत पीक विम्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील शेतकऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण देण्यासाठी पीक, ग्रामीण आणि इतर प्रकारच्या कृषी विमा उत्पादनांवर अधिक भर देणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, “केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अलीकडील हवामान संकट आणि वेगवान तांत्रिक विकासाला प्रतिसाद म्हणून PMFBY मध्ये शेतकरी समर्थक बदल करण्यासाठी सज्ज आहे.”