पावसाने ओढ दिल्याने टाकळीभान परिसरातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणी लांबल्याने शेतकरी राजावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. ऐरवी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाने झालेल्या पेरण्या निरोगी असतात.
मात्र, संपूर्ण जून महिना संपत आला असून अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
मान्सून लांबणीवर गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. आणखी काही दिवस पावसाने अशीच पाठ फिरविली तर बळीराजापुढे खरीप पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले जाणार आहे.
लवकरात लवकर पेरणीयोग्य पाऊस पडावा, अशी आशा मनी बाळगून बळीराजा हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मान्सून वेळेवर दाखल होऊन ७ जून रोजी मृग नक्षत्राचा पाऊस पडेल, अशी आशा शेतकरी मनी बाळगून होते.
मात्र, १९ जून ही तारीखही उलटून गेली; पण पाऊस पडण्याचे काही चिन्ह दिसत नसल्याने खरिपाच्या सोयाबीन, बाजरी, कपाशी, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या रखडल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्यस्थितीत शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. यंदा वेळेवर व मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक व काही जाणकारांनी व्यक्त केला होता.
त्या अनुषंगाने मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे सुरू केली होती. त्याचबरोबर पैशाची जमवाजमव करून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली आहे.
सोयाबीन, मका, कपाशी, चारा आदी खरीप पिकांची पेरणी शेतकरी पाऊस पडताच करीत असतो. मात्र, जून महिना संपायला आला तरी पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जेमतेम पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशी तसेच इतर काही पिकांच्या लागवडी केल्या. लांबणीवर पडलेल्या पावसाने तसेच विहिरी व बोअरवेलच्या कमी झालेल्या पाणी पातळीमुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही.