Havaman Andaj : यंदा देशात उशिराने दाखल झालेला मान्सून आतापर्यंत देशाच्या ८० टक्के भागात पोहोचला आहे. अतिवृष्टीमुळे हिमाचलच्या मंडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली.
यामुळे चंदिगड-मनाली महामार्गावर १५ किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह २५ राज्यांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
यंदा मान्सून नव्या पॅटर्नमध्ये देशात दाखल झाल्याचे हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार यांनी सांगितले. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत आणि महिन्याच्या अखेरीस दिल्लीत दाखल होणाऱ्या मान्सूनने सहा दशकांनंतर एकाच दिवशी दोन्ही महानगरांमध्ये हजेरी लावली.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. देशाच्या सुमारे ८० टक्के भागावर मान्सून दाखल झाला असल्याची माहिती नरेशकुमार यांनी दिली. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भूस्खलन, दरडी कोसळणे, पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी संध्याकाळपर्यंत सुमारे २० तासांच्या कालावधीत पावसामुळे चंदिगड – मनाली महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे महामार्गावर जवळपास १५ किमीपर्यंत रांगा लागल्याने वाहतूक ठप्प पडली.
यामुळे अनेक पर्यटक अडकून पडले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांचे अन्न-पाण्यावाचून मोठे हाल झाले. रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड स्फोटकांद्वारे फोडून मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील ३०१ रस्ते बंद झाले आहेत.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे बद्रिनाथ महामार्ग वाहून गेला असून राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा थांबवली आहे. याशिवाय येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, गोवा, कर्नाटकाचा किनारपट्टी भाग, झारखंड, हिमाचल, उत्तराखंड,
जम्मू- काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणालच प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब, दिल्ली, पूर्व राजस्थान, गुजरात आणि केरळ आदी राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.