Soybean Farming : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या भीज पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ थांबली असून, पीक पिवळे पडू लागले आहे. एका बाजूने पाऊस, दुसऱ्या बाजूने शंखी गोगलगाय तर, तिसऱ्या बाजूने पिकाची वाढ थांबल्याने वैराग भागातील बळीराजा तिहेरी संकटात सापडला आहे. चार पैसे मिळवून देणारा खरीप हंगामच संकटात सापडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
बार्शी तालुक्यातील आठ मंडलांपैकी तीन मंडलात पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी करण्यात आली असून, यामध्ये सुर्डी, वैराग आणि गौडगाव अशा तीन मंडलांचा समावेश आहे.
मृग नक्षत्रामध्ये सुरुवातीला पावसाने दांडी मारली. मात्र, नंतर जोरदार आगमन झाले. गेल्या २३ जुलैपासून सुर्डी, वैराग आणि गौडगाव या तीन मंडलातील चाळीसहून अधिक गावात सतत पावसाची संततधार राहिल्यामुळे सखल भागात पाणी साठले आहे.
त्यात भीज पावसाचेच प्रमाण अधिक राहिल्याने सोयाबीन, उडीद, तूर यासारखी पिकांची वाढ थांबली आहे. सततच्या ओलसरपणामुळे पांढरी मुळीची कार्यक्षमता पूर्णः ढासळली आहे.
गेल्या सात दिवसात सूर्यदर्शन न झालेल्या या भागात गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडू लागले आहे. मात्र, उन्हाच कडाका जोरदार पाऊस घेऊन येत आहे. जितके ऊन तीव्र तितक जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतातील ओल कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे.
वैराग भागातील नागझरी नदीतून पाणी वाहिले असले, तरी भोगावर्त नदी पात्रात आता पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. हिंगणी ढाळेपिंपळगाव, जवळगाव या मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
गौडगाव, वैराग आणि सुर्डी या तीन मंडलांमध्य अतिवृष्टी झाल्याची नों शासनाकडे आहे. अतिवृष्टीसोबत सततचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीच पंचनामे तत्काळ होणे गरजेच आहे.