Agriculture News : पावसाळी हंगामामध्ये पाथर्डी तालुक्यासह राज्यातील विविध ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकर्यांची खरीप हंगामातील बाजरी, मका सोयाबीन भुईमूग ही पिके करपू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी होऊनही अद्यापही पुरेसा पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये मृग आदरा नक्षत्रामध्ये अल्पशा प्रमाणात पाऊस झाल्याने या पावसावर शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून खरिपाची पेरणी केली. परंतु जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने पिके योग्य प्रमाणात वाढ होताना दिसत नाही. तसेच ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने खरीप पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज मितीस सर्व पिके कोमेजू लागली आहे.
पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक पिके करपून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील अनेक ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल विभागास चारा छावणी व पिण्याची पाण्याची टँकर सुरू करण्याची सामुदायिक मागणी केली आहे. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांपुढे सध्या दुभत्या जनावरांना चारा व पाणी चाऱ्याचे भाव वाढले सध्या उसाला तीन ते साडेतीन हजार रुपये गुंठा व मक्याला दोन ते अडीच हजार रुपये गुंठ्याचा भाव झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना हा चारा ट्रॅक्टरद्वारे व कुटी मशीनद्वारे मुरघास करून घरी आणावा लागतो. त्यामुळे एका ट्रॅक्टर साठी साधारणतः १५ हजार रुपये खर्च येतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सध्या होत आहे. यावर्षी मका बाजरी सोयाबीन भुईमूग या पिकांमधून उत्पन्न होणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे भावी काळामध्ये धान्याची तीव्रतांचा निर्माण होऊन धान्याचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख समस्या भेडसावत आहे. त्यामुळे दुधा पासून मिळणारे उत्पन्न सध्या चारा उपलब्ध करण्यामध्ये खर्च होत आहे.
त्यामुळे शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून व संबंधित महसूल यंत्रणेला आदेश देऊन पिकांची सद्य परिस्थिती चे अवलोकन करून सामुदायिक पंचनामे करून पिक विमा व सरसकट पीक नुकसान भरपाई देण्याची नागरिक मागणी करत आहे. सध्या विहिरींनी तळ गाठला असून जेमतेम पाण्यावर कुटुंबासाठी पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी राखून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सर्वच शेतकरी पाण्यासाठी वन वन करत आहे.