Agriculture News : कांदा व्यापारी संपावर ! मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार

Ahmednagarlive24 office
Published:
Agriculture News

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात गत दहा दिवसांपासून कांदा व्यापारी संपावर आहेत. परिणामी लिलाव बंद असून, आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. तरीही सरकार मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार कांदा व्यापारी असोसिएशनने केला आहे. पिंपळगाव बसवंत येथे शनिवारी असोसिएशनची बैठक पार पडली.

कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील ५०० हून अधिक व्यापारी संपात सहभागी झाल्याने कांदा पुरवठा आता विस्कळीत होऊ लागला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्णय होऊ शकला नाही.

शनिवारी पिंपळगावी नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी बाजार समितीने आकारलेल्या मार्केट शुल्काचा दर प्रति शेकडा एक रुपयाऐवजी ५० पैसे आकारावा,

आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच म्हणजे चार टक्के करावा, कांदा निर्यात शुल्क रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफमार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करून विक्री रेशनमार्फत करण्यात यावी,

केंद्र सरकार व राज्य सरकारला कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट पाच टक्के अनुदान व देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के अनुदान व्यापाऱ्यांना द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe