घटस्फोटानंतर महिलांनाही द्यावे लागतात पतीला पोटगीसाठी पैसे, जाणून घ्या नियम

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : घटस्फोटानंतर पोटगी देण्याची पद्धती आहे हे तुम्हाला माहीतच असेल. यात पती पत्नीला पोटगी देतो हे तुम्ही ऐकले असेल. पण पत्नीलाही पतीला पोटगीसाठी पैसे द्यावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे का?

नुकताच मुंबईतील एका जोडप्याचा लग्नाच्या तब्बल 25 वर्षांनंतर घटस्फोट झाला. यात विशेष असं आहे की, पत्नीने नवऱ्याला 10 कोटी रुपयांची पोटगी दिली. साधारणपणे घटस्फोटाच्या बाबतीत पतीला उदरनिर्वाहासाठी आणि पोटापाण्यासाठी पत्नीला पैसे द्यावे लागतात, असे लोकांना वाटते.

कारण त्यांना संबंधित नियम-कायदे माहीत नसतात. कोणत्याही जोडप्यासाठी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे केवळ सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक नसते, तर त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करते. त्यामुळे घटस्फोटासंदर्भातील काही तरतुदी समजून घ्यायला हव्यात…

भारतात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या रीतीरिवाजानुसार लग्न करण्याची मुभा आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या तरतुदी वेगळ्या आहेत. हिंदू विवाह व्यवस्था हिंदू विवाह कायद्याद्वारे निर्देशित केली जाते. केवळ पत्नीलाच नव्हे तर पतीलाही पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, अशी तरतूद यात करण्यात आली आहे.

हिंदू विवाह कायद्याची कलमे

हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 मध्ये ‘रेस्टीट्यूशन ऑफ कॉन्जुगल राइट्स’ (RCR) याविषयी म्हटले आहे. कोणतेही ठोस कारण नसताना पती-पत्नी एकमेकांपासून विभक्त झाल्यास एक पक्ष न्यायालयात जाऊन दुसऱ्या पक्षाला एकत्र राहण्यास सांगू शकतो.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास दोन्ही पैकी कोणीही घटस्फोटाची मागणी करू शकतात. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र, परस्पर संमतीने घटस्फोट झाल्यास या कलमाला वैधता नसते.

आरसीआर अंतर्गत, न्यायालय दोन्ही पक्षांच्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे आदेश देऊ शकते. RCR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. त्याच वेळी, हिंदू विवाह कायद्याच्या कलम 25 मध्ये देखभाल आणि पोटगीची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये पती-पत्नी दोघांनाही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, त्यात काही अटी आहेत. विशेष विवाह कायद्यांतर्गत होणाऱ्या विवाहांमध्ये केवळ पत्नीलाच पोटगी मागण्याचा अधिकार आहे.

घटस्फोटाच्या केसेसमध्ये पुरुषही त्यांच्या पत्नींकडून पोटगीची मागणी करू शकतात. नातेसंबंध संपुष्टात आल्यानंतर, पतीकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना पती पत्नीकडून पोटगी मागू शकतो. पती पत्नीच्या उत्पन्नापेक्षा कमी कमवत असेल तर पत्नीकडून पोटगीची मागणी करू शकतो. तथापि, अशी प्रकरणे क्वचितच आढळतात आणि सामान्यतः पतीच आपल्या पत्नीला पोटगी देतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe