Maruti Suzuki Sales Data October 2023 : Maruti च्या वाहनांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाची (एमएसआय) एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 19 टक्क्यांनी वाढली.
या महिन्यात तब्बल 1,99,217 युनिटसची विक्री झाली. कंपनीचा हा सर्वाधिक मासिक विक्रीचा आकडा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने 1,67,520 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने बुधवारी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये त्याची देशांतर्गत विक्री 1,77,266 युनिट्स होती, जी आतापर्यंतची सर्वोत्तम विक्री आहे.
देशांतर्गत विक्री तब्बल 21 टक्क्यांनी वाढली
गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 1,47,072 वाहनांची विक्री केली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कंपनीच्या विक्रीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीची देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री वाढून 1,68,047 वाहनांवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,40,337 युनिट्स होती. मिनी कार आणि एस-प्रेसोची विक्री या महिन्यात घटून 14,568 वाहनांवर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 24,936 वाहनांची विक्री केली होती.
कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये विक्रीत वाढ
बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर सह कॉम्पॅक्ट सेगमेंटची विक्री 73,685 युनिट्सवरून 80,662 युनिट्सवर पोहोचली. युटिलिटी व्हेइकल सेगमेंटमध्ये कंपनीची विक्री ऑक्टोबर 2022 मधील 30,971 युनिट्सच्या तुलनेत 91 टक्क्यांनी वाढून 59,147 युनिट्स झाली आहे. ब्रेझा, ग्रँड विटारा, अर्टिगा आणि एक्सएल6 मॉडेल्स या सेगमेंटमध्ये येतात. ऑक्टोबर 2023 मध्ये निर्यात देखील वाढली. ती 21,951 युनिट इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 20,448 युनिट्स निर्यात होती.
महिंद्रा अँड महिंद्राचीही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री
सणासुदीच्या काळात वाहनांची मागणी वाढत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या एकूण वाहनविक्रीत ऑक्टोबरमध्ये 32 टक्क्यांनी वाढ होऊन ती 80,679 वाहनांवर पोहोचली आहे. महिन्याभरातील कंपनीची ही सर्वाधिक विक्री आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 61,114 वाहनांची विक्री केली होती. टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया आणि टोयोटा यांची विक्री देखील प्रचंड वाढली आहे.
टाटा मोटर्सची विक्री 5.89 टक्क्यांनी वाढली
टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 5.89 टक्क्यांनी वाढून 82,954 वाहनांवर पोहोचली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री 80,825 युनिट्स झाली आहे, जी ऑक्टोबर 2022 मध्ये 76,537 युनिट्स होती. प्रवासी वाहने (इलेक्ट्रिक वाहनांसह) सेगमेंटमधील देशांतर्गत विक्री ऑक्टोबरमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 48,337 वाहनांवर पोहोचली आहे,
असे टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ही संख्या 45,217 युनिट होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह इलेक्ट्रिक वाहनांची एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 28 टक्क्यांनी वाढून 5,465 वाहनांवर पोहोचली आहे,
जी गेल्या वर्षी याच महिन्यात 4,277 युनिट्स होती. ऑक्टोबर 2022 मधील 32,912 वाहनांच्या तुलनेत गेल्या महिन्यात एकूण कमर्शियल वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढून 34,317 वाहनांवर पोहोचली.
ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री 18 टक्क्यांनी वाढली
ह्युंदाई मोटर इंडियाची एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 18 टक्क्यांनी वाढून 68,728 वाहनांवर पोहोचली आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 58,006 वाहनांची विक्री केली होती. ह्युंदाई मोटर इंडियाची देशांतर्गत विक्री ऑक्टोबर 2022 मधील 48,001 वाहनांच्या तुलनेत गेल्या महिन्यात 15 टक्क्यांनी वाढून 55,128 वाहनांवर पोहोचली आहे.
टोयोटाच्या विक्रीतही 66 टक्क्यांनी वाढ
टोयोटा किर्लोस्कर मोटरची (टीकेएम) एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 66 टक्क्यांनी वाढून 21,879 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने 13,143 वाहने डीलर्सना पाठवली होती. टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) ऑक्टोबरमध्ये 20,542 वाहनांची विक्री केली.