Agriculture News : यंदा पुरेसा पाऊस नसल्याने हिवाळ्यातच दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे. त्यामुळे यंदा पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यंदा खरीप, रब्बी हंगामांसह सर्व बाजूंनी एक कोटी ७० लाख टन चाऱ्याचे उत्पादन होण्याचा अंदाज होता;
मात्र टंचाई परिस्थितीमुळे १ कोटी टनापर्यंत चारा उपलब्ध होईल. त्यामुळे उन्हाळ्यात किमान दोन महिने चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे
महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या वर्षी पुरेसा पाऊस नाही. धरण कार्यक्षेत्रातील काही गावे सोडली, तर बहुतांशी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्ययास सुरुवात झाली आहे. खरिपात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले.
रब्बीची तर पेरणीच झाली नाही. त्यामुळे चारा स्थिती गंभीर बनली आहे. मक्याचे हेक्टरी ५५ टन, बाजरीचे ४५ टन, ज्वारीचे ५० टन, कडवळाचे ५० टन, ल्युसनं घासाचे ११० टन, नेपियर घासाचे १२५ टन, इतर चारा पिकांचे सरासरी ४० टन हेक्टरी उत्पादन निघण्याचा आमुचा कृषी विभागाने बाबत केला आहे. व्यक्त पिकांतून वर्षभरात एक कोटी टनापर्यंत चारा मिळण्याचा अंदाज आहे.
नगर जिल्ह्याला एक कोटी २० लाख टन चारा लागतो. उपलब्ध चाऱ्यानुसार आतापर्यंत सात महिन्यांचा कालावधी गेला आहे. अजून सुमारे सात ते आठ महिने चारा टंचाईचा धोका समोर उभा आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसारच पशुसंवर्धन विभाग आकडे संकलित करत आहे.
परिणामी, चाऱ्यासाठी उसाचा अधिक वापर होणार आहे. नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांसह ज्या भागात पाणी आहे. त्या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. इतरत्र चारा, शेती, पिण्याच्या पाण्याच्या गंभीर अडचणी आहेत. कोरडवाहू, दुष्काळी भागातील पशुधन जगवणे अवघड होणार आहे.
चाऱ्याचे प्रमाण अल्प
जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ११५ लहान व १३ लाख २३ हजार ५४३ मोठ्या गायी-म्हशी आहेत. १५ लाख ७९ हजार ८०३ शेळ्या, मेंढ्या आहेत. शिवाय अन्य पशुधनाचा विचार केला, तर दर महिन्याला साडेआठ लाख टनांपर्यंत चारा लागतो. त्यामुळे दुग्ध व्यवसायाचे गणित कोलमडणार आहे.