Javed Akhtar : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ०३ ते रविवार, दि. ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी केली आहे. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने श्रीयुत अख्तर यांच्या नावाची निवड केली असून या समितीत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली,
बेंगळुरू, ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर (मुंबई), प्रसिद्ध हिंदी कवी अशोक बाजपेयी (दिल्ली), फेस्टीव्हल डायरेक्टर अशोक राणे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रुपये असे आहे.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवार दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. जावेद अख्तर आणि पटकथाकार सलीम खान यांच्यासह शोले,
जंजीर, दीवार इत्यादी सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. १९९९ मध्ये जावेद अख्तर यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांना एकूण पाच वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार आणि एकूण सात वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. लोकशाही आणि प्रागतिक विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना २०२० मध्ये रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे.
केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्रालय – भारत सरकार, एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. डेलीहंट डिजिटल पार्टनर आहेत, एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात मराठवाडा आणि महाराष्ट्रभरातील अधिकाधिक रसिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम,
सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, डॉ.श्रीरंग देशपांडे, प्रोझोनचे कमल सोनी,
आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ.रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, डॉ.कैलास अंभुरे, नीना निकाळजे, निता पानसरे, सुबोध जाधव आदींनी केले आहे.