चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना ! प्रकाश निर्माण होणार आणि ऊर्जाही साठवता येणार…

Marathi News : चंद्राची रहस्ये उलगडण्यासाठी एकीकडे मोहिमांवर मोहिमा सुरू आहेत, तर दुसरीकडे चंद्रावर वस्ती तयार करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. त्यातच चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे.

अंतराळातल्या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी चांद्रभूमीचा वापर एक विसावा स्थानक म्हणून करण्यावरही खल झाला. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलासोबत चंद्राच्या गुरुत्वीय बलाचा वापर या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी चांद्रभूमी तयार केली जात आहे.

समुद्रातल्या जहाजांना जमिनीची कल्पना यावी यासाठी किनाऱ्यावर दीपगृह असतात. अशाच पद्धतीची, परंतु अधिक उंचीची दीपगृहे चांद्रभूमीवर बांधण्याचे घाटत आहे. यामुळे चांद्रभूमीवर प्रकाश निर्माण होईल आणि तिथे ऊर्जाही साठवता येईल. साठवलेली ऊर्जा अंतराळवीरांना पुढच्या मोहिमेसाठी वापरता येईल.

याशिवाय दळणवळण, दिशादर्शन आणि टेहळणीसाठी या दीपगृहाचा उपयोग करता येईल. हे दीपगृह पृथ्वीवर तयार केले जाणार आहे. त्यानंतर त्याला ‘हनीबी रोबोटिक्स’ यान चांद्रभूमीवर उतरवेल.

त्याला ‘लूनार युटीलिटी नॅव्हीगेशन विथ अॅडव्हान्स रिमोट सेन्सिंग अॅण्ड ऑटोनोमस बीमिंग फॉर एनजी रिडिस्ट्रीब्युशन’ असे लांबलचक नाव आहे. या दीपगृहाची उंची ३३० फूट असेल.

तसेच त्याची उंची आणखी ६५० फुटांनी वाढवता येण्यासारखी असेल. सौरऊर्जेवर हे दीपगृह लखलखतील. हा दीपगृह चंद्राच्या दक्षिण भागातूनही दिसेल इतका उंच असणार आहे. उंचीमुळे त्याला सूर्याची ऊर्जा सहज मिळेल.

कॅलिफोर्नियातील अल्टाडेना येथील हनीबी रोबोट्क्सिमधील एक्स्प्लोरेशन सिस्टम कंपनीचे उपाध्यक्ष क्रिस अॅक्नी यांच्या म्हणण्यानुसार, चंद्राची अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सर्वात उंच अशा या दीपगृहावर कॅमेरे आणि संपर्क यंत्रणा असेल.

त्यामुळे चंद्रावर पोहोचणाऱ्यांना पृथ्वीशी संपर्क साधताना अडथळे येणार नाहीत. तसेच चांद्रभूमीवर उतरणाऱ्यांना प्रवास करण्यासाठी प्रकाश उपलब्ध होईल. असेच एक किंवा दोन दीपगृह दक्षिण गोलार्धात बांधल्यास हा संपूर्ण भाग कायमचा प्रकाशमय होईल.

याबाबत हनीबीचे प्रमुख संशोधक विष्णू सानिगपल्ली यांच्या म्हणण्यानुसार, चंद्राच्या दोन्ही गोलार्धात उंच असे पर्वत आहेत. त्यावर असे मनोरे बसवल्यास चांद्रभूमी कायमची प्रकाशमय करता येईल. मात्र नासाने या दाव्याला छेद देत अशी योजना प्रत्यक्षात आकारास येऊ शकत नाही असे स्पष्ट केले.

लुनार रिकॉनसन्स ऑर्बिटर या मोहिमेदरम्यान चांद्रभूमीचा नकाशा तयार करण्यात आला. त्यानुसार चंद्राच्या दोन्ही गोलार्धात अशा स्वरूपाचे उंच पर्वत नाहीत. म्हणजेच पर्वत आहेत, परंतु सतत सूर्यप्रकाश मिळवतील इतक्या उंचीचे नाहीत. त्यातही बारोमास त्यांना सूर्याचा प्रकाश मिळेलच की नाही, हे सांगता येणे कठीण आहे.