सगळं मातीमोल झालं ! कांदा ५ ते १० रुपयांवर आला, मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही निघेना

Ahmednagarlive24 office
Published:
Agricultural News

 

Agricultural News : शेतकऱ्यांची दैना काही मिटण्याचं नाव घेईना. मध्यंतरी ४० रुपयांवर गेलेला कांदा आता चांगले दिवस आणेल असे वाटत असताना आता कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. ५ ते १० रुपये प्रतिकिलोवर कांदा आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल झाले आहेत. मार्केटमध्ये एक नंबर कांद्याला १००० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. हे सारे खापर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणावर फोडले आहे.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) झालेल्या कांदा निलावात कांद्याचे भाव खूपच गडगडले होते. रविवारी (२४ डिसेंबर) ५०२१ कांदागोण्यांची आवक झाली होती. यापैकी २६४१ गोणी कांद्याला १००० ते १२०० रुपये,

२४०० गोणी कांद्याला १३०० ते १८०० रुपये, तर २५०० गोणी कांदा ५५० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. या भावामुळे कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना वाहतूक खर्चासाठीही पदरमोड करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

खर्चाचा हिशोबच जुळेना

सध्या कांद्याला मिळणार भाव एकरी खर्च याचा ताळमेळच जुळत नाहीये. एक एकर कांदा असेल तर लागवडीपासून ते काढणीपर्यंत ९० हजार रुपये खर्च होतात. एकरी साधारण ४० क्विंटल कांदाउत्पादन मिळते.

१ क्विंटल कांदा काढणीसाठी २५० रुपये, असे एकरी १० हजार रुपये मजुरांनाच द्यावे लागतात. एक क्विंटल कांदा भरण्यासाठी लागणारा बारदाणा ८० रुपये, एक क्विंटल कांदा वाहतुकीसाठी १०० रूपये, हमाली-तोलाई वाराई खर्च २० रूपये,

म्हणजे फक्त काढणीपासून ते मोंढ्यावर कांदा आणेपर्यंत एक क्विंटलसाठी ५५० रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च व उतपादन याचा ताळमेळ बसवनच अवघड झाले आहे.

नाफेडने २ लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, ५ टक्के कांदा खरेदी करून १८ ते २० रुपये किलोने खुल्या बाजारात विक्री केली जात आहे.

 निर्यातबंदी विरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्रात लोकप्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी या निर्णयास विरोध करणे आवश्यक होते. निर्यातबंदी विरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.