Indonesia News : जकार्तावरील वाढते ओझे कमी करण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने राजधानी बदलण्याचे ठरवले आहे. नुसंतारा ही इंडोनेशियाची नवी राजधानी असेल. त्याअनुषंगाने सर्व सरकारी कार्यालये तिथे हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
बोर्नियो द्वीपावर असलेल्या नुसंतारा ‘परिसर अडीच लाख हेक्टरचा आहे. इंडोनेशियाच्या मधोमध असलेले नुसंतारा शहर जकार्तापासून २०० किलोमीटर दूर आहे. नुसंताराची निर्मिती हा ‘गोल्डन इंडोनेशिया २०४५’ या प्रकल्पाचा भाग आहे.

राष्ट्रपती जोको विडोडो यांनी २०१९ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. २०४५ पर्यंत इंडोनेशियाला पाचवी सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीने ही योजना आखण्यात आली आहे. देशाची जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या एकट्या जकार्तामध्ये एकवटली आहे. त्यामुळे जकार्तामध्ये जल, वायू आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होऊ लागल्या.
वाहतूक कोंडीने कळस गाठायला सुरुवात केली. एकूणच वातावरण खराब होऊ लागल्याने ‘साथजन्य आजारांचा फैलाव वाढू लागला.
नद्या प्रदूषित होऊ लागल्या. त्यापेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे समुद्र किनारे गिळंकृत करू लागला. समुद्राचा जलस्तर वाढू लागल्याने जकार्ता दरवर्षी १७ सेंटीमीटरने पाण्याखाली जात आहे.
त्यामुळेच ईस्ट कलिमंतान क्षेत्रातील बोर्नियों द्वीपावर राजधानी शहर हलवण्याचा प्रस्ताव २०२२ मध्ये पारित करण्यात आला. २०२४ पर्यंत इंडोनेशियाला नवी राजधानी मिळालेली असेल. जगातल्या केवळ आठ देशांनीच आपल्या राजधानी स्थानांतरीत केल्या आहेत.
१९४५ मध्ये इंडोनेशिया स्वतंत्र झाला. नॅशनल रिसर्च सेंटरच्या राजनीती विभागाचे प्रमुख डॉक्टर अतिका नूर अलामी यांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्यानंतर आता कुठे राजधानी हलवण्यावर सरकारने गांभीर्याने निर्णय घेतला. पहिले राष्ट्रपती सुकाणों यांनीही या मुद्दयाला छेडले होते.
त्यांना पलंगकराया येथे राजधानी हलवायची होती. त्यानंतरचे राष्ट्रपती सुहार्ती यांनी जकार्ताच्या जवळच नवे शहर वसवण्याची योजना आणण्याचा विचार केला होता.
अलामी यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय योग्य आहे. जकार्तामध्ये एक कोटी २० लाख नागरिक वास्तव्यास आहेत. नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी ३५ अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.
त्यातला सरकारचा हिस्सा १९ टक्के असेल. पाच टप्प्यांत शहर वसवले जाणार आहे. त्यासाठी दोन लाख श्रमिक घाम गाळणार आहेत. २०२४ मध्ये निर्माण होणारा टप्पा महत्त्वाचा असेल.
त्यात राष्ट्रपती निवास, सरकारी इमारती, प्रशासनिक कार्यालये, रहिवासी इमारती, रुग्णालयांचे काम सुरू आहे. जवळपास ४० टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सध्या विमान तळ आणि मुख्य हमरस्त्यांची कामे सुरू आहेत.
२०४० ते २०४५ या काळात शिक्षण, रस्ते, आरोग्यासंबंधीच्या कार्यालयांचे कामकाज पूर्ण केले जाणार असून हा शेवटचा टप्पा असेल.
तोपर्यंत २० लाख नागरिकांचा भार उचलण्याची क्षमता राजधानी नुसंताराची असेल. अगोदर मंत्रालयाची कामे पूर्ण होतील. त्यानंतर २०३० ते २०३५ पर्यंत दुसऱ्या टप्यात इतर कार्यालयांचे कामकाज सुरू करून सरकारी अधिकाऱ्यांसाठी राहण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. जकार्तासाठी विशेष क्षेत्राचा दर्जा असेल.
त्यासंबंधीच्या कायद्यांचा अभ्यास सुरू आहे. जकार्ताला आर्थिक राजधानीचा दर्जा देण्यावर विचार सुरू आहे. नव्या राजधानीला पुराचा धोका असल्याने बांध बांधण्याचे कामही केले जात आहे.
जकार्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने त्यासंबंधीच्या उपाययोजना आखल्या जात असल्याचे डॉक्टर अतिका नूर अलामी यांनी सांगितले.