Pune News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. अलीकडे या शहराला आयटीआय म्हणूनही ओळखले जाते. हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही चिरपरिचित आहे. पण, दिवसेंदिवस शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या अन वाढती वाहनांची संख्या यामुळे पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाने पुणे रिंग रोडचे काम हाती घेतले आहे.

सध्या स्थितीला पुणे रिंग रोडचे भूसंपादन सुरू आहे. येत्या काही वर्षात हा रिंग रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. तत्पूर्वी मात्र वाहतूक कोंडीची जटील समस्या निकाली काढण्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून पुणे शहरात जड वाहनांना एन्ट्री राहणार नाही. प्रामुख्याने शहरात जड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
दरम्यान याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना शहरात एंट्री राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पुणे-नगर ,पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी उद्या अर्थातच 5 मार्च 2024 पासून होणार आहे. यामुळे जड वाहनचालकांना इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. या वाहणांना उद्यापासून वाघोली ते पुणे शहराच्या दिशेनं 24 तास प्रवेश बंद राहणार आहे.
या मार्गांऐवजी आता या जड वाहन चालकांना शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जाता येणार आहे.
तसेच, सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा येथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गे प्रवास करता येणार अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पुणे सासवड येथून येणाऱ्या जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे.
येथून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार असे यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी सुटणार अशी आशा व्यक्त होत आहे. तथापि या निर्णयामुळे वाहतूक कोंडी फुटणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.