Ahmednagar News : अहमदनगर मधील शेतकरी आता आधुनिकतेला प्राधान्य देत आहे. विविध प्रयोगशील तंत्र वापरून तो शेतीमध्ये उत्पन्न घेत आहे. अकोलेमधील काळ्या गव्हाचे उत्पन्न असेल किंवा श्रीगोंद्यातील खरबूज शेती असेल किंवा संगमनेरमधील सफरचंदाची बाग असेल असे नानाविध प्रयोग शेतकरी करत आहेत.
आता संगमेनर तालुक्यातील शेतकऱ्याचा वांगे पिकाबाबतचा एक अनोखा प्रयोग देखील चर्चेचा विषय ठरत आहे. संगमेनर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील घोडमाळ शिवारात राहणारे शेतकरी मच्छिंद्र दादा दिघे यांनी दुष्काळावर मात करत दोन एकर क्षेत्रात मल्चिंग करीत सेंद्रिय पद्धतीने वांगी पिकाची लागवड केली आहे.

उन्हाळ्यात बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यांनी विकास मल्चिंगचा वापर केला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि सध्या उन्हाळ्याचा तडाखा व पाणीटंचाई सुरू असतानाही त्यांनी दोन एकर क्षेत्रांत सेंद्रिय पद्धतीने नऊ फूट रुंदी ठेवून सारे पाडले आणि त्यावर दोन फूट अंतरावर वांगी रोपांची लागवड केली. यासाठी त्यांनी प्रतिरोप चार रुपये प्रमाणे ग्लान जातीच्या वांगी रोपाची खरेदी केली.
दोन एकर क्षेत्रांत लागवड करण्यात आलेल्या वांगी पिकास पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनची व्यवस्था केली असून चार रुपये प्रमाणे ग्लान जातीचे पाच हजार ४०० वांगी रोपांची खरेदी करीत लागवड केली.
पिकासाठी त्यांनी शेणखत आणि कोंबड खताचा वापर केला.
संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने वांगी पीक घेत असल्याचे शेतकरी मच्छिंद्र दिघे यांनी सांगितले. सध्या त्यांच्या शेतात वांगी पीक बहरू लागले आहे. बाजारात वांग्यांना असणारी मोठी मागणी लक्षात घेता यंदा वांगी पीक किफायतशीर ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लागवडीनंतर साधारणपणे दीड महिन्यापासून वांगी पिकाचे उत्पादन सुरू होते. भाजीपाला पीक असलेल्या वांग्यांना बाजारात मोठी मागणी असते आणि भाव चांगला मिळतो. त्यामुळे वांगी पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जर असे आधुनिक व सेंद्रिय खताचे प्रयोग केले तर निश्चितच उत्पन्न चांगले मिळेल यात शंका नाही.













